यंदा केवळ ३ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
विमा भरण्याचा आज अखेरचा दिवस; मुदतवाढ मिळण्याची शक्यता
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
शासनाने दोन वर्षांपूर्वी लागू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये यंदा पूर्णतः बदल करण्यात आला असून, नवीन पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. १ रुपयात विमा बंद करण्यात आल्याने या नवीन योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
नवीन पीक विम्याची नियमावली जाचक असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी योजनेला फारसा प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी पीकविमा योजनेत सहभागीच झाले नसल्याने नवीन पीक विमा योजनेवर शेतकऱ्यांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हजारो रुपये प्रीमियम भरूनही विमा मिळण्याची शाश्वती नसल्याने शेतकरी पीक विमा योजनेबाबत साशंक आहेत.
गेल्यावर्षी २०२४ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ७ लाख १९ हजार ६३३ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यावर्षी मात्र ३० दिवसात केवळ ३ लाख ८२ हजार ६४७ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा भरण्यास आणखी एक दिवसांचा अवधी असला तरी ही संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत नगण्य आहे.
त्यामुळे पिक विमा काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांना मुदतवाढ देईल अशी शक्यता आहे. परंतु, मुदतवाढ देऊनही त्याला शेतकरी फारसा प्रतिसाद देतील याची शक्यता कमी आहे.
एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्यानंतर मागील दोन हंगामात धाराशिव जिल्ह्यात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. २०२३ मध्ये ७ लाख ५७ हजार ८५३ शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा भरला होता.
तर २०२४ मध्ये ७ लाख १९ हजार ६३३ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. पण, यंदा आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३ लाख ८२ हजार ६४७ शेतकऱ्यांनीच विम्यासाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ३ लाख ६ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा काढून संरक्षित करण्यात आली आहेत.
यामध्ये सर्वाधिक विमा सोयाबीन या पिकासाठीच काढला आहे. आज विमा भरण्याचा शेवटचा दिवस असून, या संख्येमध्ये फारशी भर पडेल याची शक्यता नाही. २०२३ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक ७ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यामुळे यंदा तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला नसल्याचे समोर आले आहे.
विमा मदतीची शाश्वती कमी झाल्याने शेतकरी विम्यापासून दूर
एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारे भरपाई दिली जात होती. नवीन बदलांनुसार, यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत.
आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. हे नियम जाचक ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पीक वाढीच्या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट, पूर परिस्थिती झाल्यास किंवा कीड वा रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास, तसेच पीक काढणीनंतर मोठा पाऊस किंवा गारपीट झाली तर आधी नुकसानभरपाई मिळत होती. आता हे सर्व कव्हर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता नुकसान भरपाई फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित असणार आहे.
तालुका – पीक विमा भरलेले शेतकरी – एकूण संरक्षित क्षेत्र (हेक्टर)
भूम – ४४७८१ – २६०१९
धाराशिव – ७१७२३ – ६७८११
कळंब – ६३५२३ – ४६७०३
परंडा – २७४७९ – १३७५३
लोहारा – २५३४९ – २३१२७
तुळजापूर – ६१६३६ – ६४८०१
उमरगा – ४३९७६ – ३८३३७
वाशी – ४४१८० – २५८५४
एकूण – ३८२६४७ – ३०६४०८.
मागील चार वर्षातील विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या
वर्ष – शेतकरी संख्या
२०२१ – ६,५३,९८८
२०२२ – ६,६८,४३६
२०२३ – ७,५७,८५३
२०२४ – ७,१९,६३३
२०२५ – ३,८२,६४७