आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी आज (2 डिसेंबर) सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरूवात झाली. पहिल्या सहा तासांत जिल्ह्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली असून, पुढील अडीच तासात मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर उमेदवारांना भर द्यावा लागणार आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी एकूण 38.42 टक्के मतदानाची नोंद झाली असून, दुपारी तीननंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
पहिल्या सहा तासांतील मतदानाचे प्रमाण असे आहे –
धाराशिव नगरपालिका – 31.45%
तुळजापूर – 47.98%
नळदुर्ग – 40.44%
उमरगा – 38.51%
मुरूम – 47.55%
कळंब – 38.41%
भूम – 46.94%
परंडा – 41.50%
जिल्ह्यात सर्वाधिक मतदान तुळजापूर आणि मुरूम (सुमारे 48%) येथे नोंदले गेले आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 लाख 43 हजार मतदारांपैकी आतापर्यंत 93,618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
यामध्ये –
पुरुष मतदार – 48,802
महिला मतदार – 44,807
नगरपालिकानिहाय मतदारांची संख्या
धाराशिव – 29,564
तुळजापूर – 14,182
नळदुर्ग – 6,924
उमरगा – 12,242
मुरूम – 7,095
कळंब – 8,051
भूम – 8,485
परंडा – 7,075
सकाळच्या पहिल्या दोन तासांत अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा दिसून आल्या. मात्र सकाळी अकरानंतर मतदानाचा वेग मंदावल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळेत मतदारांचे प्रमाण कमी असले तरी दुपारी तीननंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत आणि सुरळीत मतदान सुरू आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी धाराशिव शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आहे.
पोलिस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मतदानासाठी आता शेवटचे अडीच तास उरले असून, उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही मतदान केंद्रांवर दुपारी रांगा वाढल्याचेही चित्र आहे.
दरम्यान, मतमोजणीची प्रक्रिया उच्च न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये काहीशी निराशा आणि तणाव निर्माण झाला आहे.









