आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत येत्या ६ किंवा ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत, सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी तुळजाभवानी ट्रस्ट, तेरणा ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन यांचे सहकार्य लाभणार आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत ठरविण्यात आली असून, इच्छुकांनी आपल्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती देताना “मित्र” चे उपाध्यक्ष व आमदार राणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हा केवळ विवाह सोहळा नसून एक सामाजिक ऐक्य आणि मदतीचा उपक्रम आहे.
यासाठी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी सहकार्य करावे.” आमदार पाटील पुढे म्हणाले की, “विवाह होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल.
यावर्षी धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या सामुदायिक विवाह उपक्रमामुळे त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा आर्थिक भार कमी होईल.
धाराशिव जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात होत असून, त्यानंतर राज्यातील इतर पूरग्रस्त भागातही या पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपत सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.









