सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर; नगरीत शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि शक्तीची आराधना. याच नवरात्र महोत्सवाला अधिक धार्मिक व सामाजिक परिमाण मिळावे, नारीशक्तीचा गौरव व्हावा या उद्देशाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे यंदा ‘नऊ दिवस, नऊ दुर्गा सन्मान’ हा अद्वितीय उपक्रम राबविण्यात येत आहे.
दररोज एका क्षेत्रात विलक्षण कर्तृत्व गाजविणाऱ्या एका स्त्रीचा सन्मान असा उपक्रम राबविला जाणार असून, नवरात्रात एकूण नऊ दुर्गांचा सन्मान होणार आहे.
या आहेत निवड झालेल्या दुर्गा,
अस्मिता अविनाश सूर्यवंशी (गुंजोटी, उमरगा) – शेवया उत्पादक गट व ‘घे भरारी’ विजेत्या, बाबई उर्फ सुजाता लक्ष्मण चव्हाण (अणदूर, तुळजापूर) – बालविवाह प्रतिबंध कार्य, अनिता नामदेव देवकते (सौंदणा आंबा, कळंब) – आवळा उत्पादने निर्मिती व प्रेरणादायी एकल प्रवास, प्रियंका रघुवीर पासले (तीर्थ, तुळजापूर) – संघर्षमय उपजीविका उपक्रम, सारिका रामेश्वर येळेकर (बेंबळी, धाराशिव) – शेळीपालन क्षेत्रातील पुढाकार, रोहिणी धीरज सुरवसे (वाखरवाडी, धाराशिव) – शासकीय योजनांचा प्रभावी प्रसार, नंदा राजेश जगताप (वाघेगव्हाण, परांडा) – मासिक पाळी व्यवस्थापन व परसबाग जागृती, वैशाली जाधव (गणेगाव, भूम) – एकल महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न, लक्ष्मी कल्याण मोरे (बेंडकाळ, लोहारा) – सेंद्रिय शेती प्रचार.
याशिवाय, बी-बियाण्यांची जननी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा विशेष गौरव होणार आहे. देशी बियाण्यांची बँक निर्माण करून त्यांनी सेंद्रिय शेतीची नवचैतन्यपूर्ण दिशा दाखवली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार बहाल केला असून, बीबीसीने त्यांना जगातील प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत स्थान दिले होते.
मातेच्या नवरात्रोत्सवात नारीशक्तीचा असा सामूहिक गौरव होत असल्याने, या दुर्गांचा सन्मान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे.