आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेची शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे.
शहरातील शहर पोलीस स्टेशन जवळील संत गाडगेबाबा चौकात रस्त्याच्या कडेला खोदकाम चालू असताना आज सकाळी शहरातील मुख्य पाईपलाईन फुटली. यावेळी पाण्याला मोठे प्रेशर असल्यामुळे पाण्याचे उंच कारंजे रस्त्यावरच सुरू झाले होते.
काही वेळ जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचे फवारे अडवण्यात आले. परंतु फुटलेल्या पाईपलाईनला काहीच करता आले नाही. त्यामुळे मागील दोन ते अडीच तासांपासून लाखो लिटर पाणी भोगावती नदीपात्रात वाहून जात आहे.
धाराशिव शहरात दहा ते पंधरा दिवसाला एकदा नळाला पाणी येते. पाण्यावाचून उन्हाळ्यात शहरातील नागरिकांचे मोठे हाल होत असताना, अशा प्रकारे पाणी वाया जात असल्यामुळे पालिका प्रशासनावर टीका होत आहे. विशेष म्हणजे पाईपलाईन फुटून बराच कालावधी झाला तरी पालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता.
आज शासकीय सुट्टी असल्यामुळे घटनास्थळी कोणी धाव घेतली नाही. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असून, यामुळे संत गाडगे बाबा चौकात रहदारीस देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे.