प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांची मुंबई वारी विकासाला गती देणार का?
आरंभ मराठी / धाराशिव
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (दि.९) धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांची आढावा बैठक थेट मुंबईतील त्यांच्या खात्याच्या मध्यवर्ती कार्यालयात घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी आपण उत्सुक असून, गटातटाचा विचार न करता निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ही बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा क्रीडाअधिकारी श्रीकांत हरनाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी.एम.थोरात, कार्यकारी अभियंता एस.के.चव्हाण व एस.व्ही भांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, नगरपालिका प्रशासनाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी वसुधा फड, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय आडे, विभागीय वनाधिकारी बी.ए.पोळ, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी व्ही.के.करे व राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता एस.ए.उबाळे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेले तालुका प्रमुख, जिल्हाप्रमुख युवा सेनेचे पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना अवगत केले. इतर खात्याचे संबंधित असलेल्या प्रश्नाबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट संबंधित मंत्र्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून पाठपुरावा केला.
यावर उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच सर्वांना एकत्र घेऊन जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,सुरज साळुंके,दत्तात्रय साळुंके,मोहन पनुरे, सुधीर पाटील,योगेश केदार,अमरराजे कदम यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिलेल्या या बैठकीला माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत उपस्थित नव्हते. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातील खोळंबलेल्या विकास कामांना या बैठकीतून गती मिळेल का याची उत्सुकता आहे.