नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर घेतला निर्णय, २१ मेपासून दूध संकलन, दूध पॅकिंग, प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा विचार
धाराशिव : तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला पुन्हा अच्छे दिन येण्याची आशा आहे. दूध संघावरील अवसायक हटविण्यात आले असून, संघाला पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी दूध संघाचे सभासद तसेच संचालक मंडळ सरसावले आहे.
बुधवारी दुपारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत संचालक मंडळाने दूध संघ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २१ मेपासून दूध संकलन करण्यात येणार असून, दुग्ध प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यामुळे राजकारण्यांनी बुडवलेल्या एका महत्वाच्या सहकारी संस्थेला सभासदांच्या माध्यमातून पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
एकेकाळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघाला गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे.या दूध संघाचा शुभारंभ २२ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतराव पाटील आणि दुग्धविकासमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता.
दूध संघाची सुरूवातीपासूनच भरभराट होत गेली. संघाकडे तब्बल ८०२ संस्था जोडल्या गेल्या होत्या तर सुमारे १ लाख लिटरहून अधिक दूध संकलन करण्यात येत होते. मात्र,सहकारातून स्वाहाकार करण्याच्या राजकीय मानसिकतेने अन्य सहकारी संस्थेप्रमाणेच दूध संघाचाही स्वाहा झाला. पदावर बसलेल्या अनेकांनी कमी-अधिक प्रमाणात दूध संघ ओरबाडण्याचे उद्योग केले.
परिणामी संघ डबघाईला आला.याच काळात दूध संघाची विभागणी झाली आणि दूध संकलनावर परिणाम झाला. लुटमारीच्या धोरणांमुळे तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघ आर्थिक अडचणीत आला.कर्मचाऱ्यांचे वेतन, संस्थांची देणी वाढत गेली.
संघ बंद पडल्यानंतर थकबाकी वूसलीसाठी संस्थांच्या प्रतिनिधींनी आंदोलन केले. संचालकांना कार्यालयातच कोंडण्याचे प्रकार झाले.मात्र, संघाला लुटलेल्या राजकारण्यांनी संघाच्या उतरणीच्या काळात हात काढून घेतले. त्यामुळे दूध संघावर अवसायक नेमण्यात आले.
देणी फेडण्यासाठी अवसायकाच्या माध्यमातून मुख्यालयाची अत्यंत मोक्यावरील जागा कवडीमोल दराने विक्री करावी लागली.त्यानंतर अवसायकांना हातपाय हलवण्यासाठी संधी मिळाली नाही.दूध संघ पुरता बुडाला. मात्र, दूध संघाचे ऐश्वर्य डोळ्यांनी पाहिलेल्या सभासदांनी आणि काही प्रामाणिक संचालकांनी दूध संघाला उभारी देण्याचे आव्हान स्विकारले आहे.
२८ एप्रिल रोजी अवसायकांना हटवून दूध संघाच्या संचालक मंडळाने दूध संघाचा ताबा घेतला आहे. आम्ही पुन्हा एकदा प्रामाणिक प्रयत्न करून दूध संघ सुरू करू, संघाला गतवैभव मिळवून देऊ, असा निर्धार करत संचालक मंडळाने बुधवारी दुपारी झालेल्या पहिल्या बैठकीत केला तसेच यावेळी चेअरमनपदी रामेश्वर वैद्य तर व्हाईस चेअरमन म्हणून अंकुश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीनंतर संचालक मंडळाने दूध संघ पुन्हा पुनर्जिवित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यात दूध संघाच्या माध्यमातून तत्काळ म्हणजेच २१ मेपासून दूध संकलन सुरू करण्यात येणार आहे. दूध संघाकडे सध्या कार्यरत केवळ २६ सभासद आहेत.सभासदांची संख्या वाढवणे, संकलन वाढवून पॅकेजिंग तसेच दूध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देणे, असे निर्णय घेण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे बुडालेली सहकारी संस्था पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर आहे. मात्र,यामध्ये राजकारण घुसले तर पुन्हा पूर्वीप्रमाणेच संघाची गत होईल, प्रामाणिक प्रयत्नांना खीळ घातली जाईल, हे मात्र निश्चित.
नेमकी प्रक्रिया कशी करणार ?
प्रशासकीय पातळीवर अवसायनाच्या निर्णयावर स्थगिती आणण्यात आली असून,२८ एप्रिल रोजी अवसायक हटविण्यात आले आहेत.तर २०२३ मध्ये निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळातून निवडण्यात आलेल्या पूर्वीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनला वगळून बुधवारी म्हणजेच ७ मे रोजी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अर्थात त्यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. या संचालक मंडळाने दूध संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे.वास्तविक २०२३ मध्येही दूध संघ सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तो प्रयत्न असफल झाला होता. आता नवे संचालक मंडळ दूध संघाला बळ देण्यासाठी कामाला लागले आहे. त्यात त्यांना किती प्रमाणात यश मिळते, हे येणारा काळच ठरवेल.
नळदुर्गची जागा विक्री करणार,
जिल्हा सहकारी दूध संघाकडे कळंबनजिक डिकसळ येथे दूध शीतकरण आणि प्रक्रिया उद्योगासाठी मालकीची जागा आहे. याच ठिकाणी पूर्वीप्रमाणे दूध प्रक्रिया करण्याचा प्रयत्न नवीन संचालक मंडळाचा असेल. तसेच यासाठी लागणाऱ्या ८ कोटींच्या यंत्रसामग्रीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे.खर्चाचा काही भाग म्हणून दूध संघाची नळदूर्ग येथील जागा विक्री करण्यात येणार आहे.