सुविधांचा अभाव, तरीही शुल्क वाढीचा भडीमार, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्यांचे दर वाढणार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे नियम सामान्य रूग्णांसाठी त्रासदायक,
_
धाराशिव : जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना बुधवारपासून (दि.७) १० रूपयांऐवजी २० रूपये देऊन ओपीडी पेपर घ्यावा लागेल. यासोबतच डॉक्टरांनी सूचवलेल्या प्रत्येक तपासणीला अतिरिक्त शुल्क द्यावे लागतील. काही तपासण्यांचे दर दुप्पट असतील. वैद्यकीय महाविद्यालयाकडे व्यवस्थापन असल्याने जिल्हा रूग्णालयातील रूग्णांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.त्यामुळे ही वाढ करण्यात येत आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अद्याप स्वतंत्र इमारत किंवा रूग्णालय नसल्याने जिल्हा रूग्णालयावरच कारभार सुरू आहे.त्यातच तज्ञ डॉक्टरांची टीम अद्याप रूजू झालेली नाही, कोणत्याही अत्याधुनिक सुविधांचा पत्ता नाही. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियमांचा बडगा आल्याने सर्वसामान्य रूग्णांचा आर्थिक भूर्दंड वाढणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी चार वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या सर्व इमारतींसह साडेदहा एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाला भाडेकरारावर दिली होती.त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील संपूर्ण अधिकारी, कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात आहे.
त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रूग्णालयात नामधारी झाले आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हेच जिल्हा रूग्णालयाचेही कारभारी झाले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे धोरणात्मक नियम सार्वजनिक आरोग्य विभागापेक्षा भिन्न आहेत.मात्र, व्यवस्थापन असल्याने जिल्हा रूग्णालयातही वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे ओपीडीसह तपासणी शुल्कांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने आधुनिक तंत्रज्ञान वापराच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात नेक्स्ट जनरेशन हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (Next Gen HMIS) प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून,त्याची अंमलबजावणी बुधवारपासून करण्यात येणार आहे. याचवेळी रूग्णांच्या तपासणी शुल्कामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार रूग्णांसाठी ओपीडी नोंदणी शुल्क १० रूपयांऐवजी २० रूपये करण्यात येणार आहे. तसेच प्रयोगशाळेसह अन्य तपासण्यांचे शुल्क वाढवण्यात येणार आहेत.यामध्ये रक्त तपासण्यासह सोनोग्राफी, एक्स रे आदी सर्व तपासण्यांचा समावेश आहे. एकीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे सुविधा नसताना शुल्क वाढ करून वैद्यकीय शिक्षण प्रशासन सामान्य रूग्णांची लूटमार का करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा शासकीय रूग्णालय वगळता जिल्ह्यातील कोणत्याही उपजिल्हा किंवा ग्रामीण रूग्णालयात शुल्कांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
आधी ओपीडीची वेळ कमी, आता शुल्क वाढ
एकीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाने रूग्णांना सुमारे ५ लाख रूपयांपर्यंत आरोग्य सेवा मोफत देण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतलेला असताना आता सरकारी रूग्णालयामध्येच वैद्यकीय शिक्षण विभागाकडून प्रत्येक तपासण्यांसाठी शुल्क वाढवण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडील अत्याधुनिक सुविधा, सेवा असलेल्या रूग्णालयांमध्ये ही दरवाढ शक्य आहे. कारण अशा ठिकाणी तज्ञ डॉक्टर सेवा देतात. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अद्याप स्वत:ची इमारत, सुविधा, तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना धाराशिवसारख्या ठिकाणी शुल्कवाढ सामान्यांना न परवडणारी आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यापूर्वीच जिल्हा रूग्णालयातील ओपीडीची वेळ दुपारपर्यंतच केली आहे. आता शुल्कवाढ करून नियमांचा बडगा उगारला जात आहे.
_
जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार, शुल्क वाढ खपवून घेणार नाही – आमदार कैलास पाटील यांचा इशारा
शासनाने निवडणुकांपूर्वी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शासनाच्याच वैद्यकीय शिक्षण विभागाने शुल्कवाढ करून जनतेच्या डोक्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात मोफत उपचार आणि अत्यल्प दरात सर्व प्रकारच्या तपासण्या होत असताना वैद्यकीय शिक्षण विभागाने शुल्कवाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणारा वर्ग अत्यंत सामान्य वर्गातील असतो. त्याला तपासण्यासाठी अधिकचा खर्च येणार असेल तर असा प्रकार खपवून घेणार नाही. अधिष्ठातांनीं हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे.
रूग्णांना डिजीटल स्वरूपात रिपोर्ट
नेक्स्ट जनरेशन हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम प्रणालीमुळे रूग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये सुसंगत, पारदर्शक सेवा ठरेल.रूग्णांची संपूर्ण माहिती आता डिजीटल स्वरूपात नोंदवली जाईल. त्यामुळे नोंदणीपासून रिपोर्टपर्यंत सर्व टप्पे एकाच ठिकाणी दिसतील.यामुळे रूग्णांना त्यांच्या तपासणी अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. एकाच हेल्थ आयडीद्वारे संपूर्ण वैद्यकीय हिस्ट्री डिजीटल स्वरूपात उपलब्ध होईल.
-डॉ.शैलेंद्र चौहान, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,