आरंभ मराठी / धाराशिव
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही धाराशिव शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या भव्य दुचाकी रॅलीचे नेतृत्व मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील करणार आहेत. या रॅलीची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
धाराशिवमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी भव्य दिव्य शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात महत्वाचा भाग म्हणजे भव्य दुचाकी रॅली. या रॅलीसाठी शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातून हजारो शिवप्रेमी तरुण अत्यंत उत्साहाने सहभागी होतात.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी या रॅलीचे नेतृत्व केले आहे. या रॅलीसाठी गेल्यावर्षी मनोज जरांगे यांनी वेळ दिली होती.
मात्र, त्यांचे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू झाल्याने आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रॅलीसाठी येऊ शकले नव्हते. जरांगे यांची मुलगी आणि मुलाने गेल्यावर्षी या रॅलीचे नेतृत्व केले होते.
यावर्षी मात्र मनोज जरांगे यांनी या रॅलीसाठी येण्याचे मान्य केले असून, त्यांच्या स्वागतासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समिती तयारीला लागली आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निघेल.
शहरातील प्रमुख मार्गावरून निघणाऱ्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने दुचाकीवरील तरुण सहभागी होतील.