धाराशिव : आरंभ मराठी
धाराशिव शहरात बनावट पोलीस बनून एका ज्येष्ठ नागरिकाची भरदिवसा फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभुलिंग प्रतयाप्पा राजुरे (वय 62, रा. गणेशनगर धाराशिव) गुरुवारी (दिनांक १७) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास साठे चौकाजवळील एस.टी. गॅरेजसमोर उभे असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवर आले, आम्ही पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे, असे सांगत त्यांनी राजुरे यांच्याशी संवाद साधला.
त्यातील एका व्यक्तीने फिर्यादींच्या खांद्यावर हात ठेवत तुमच्या हातातील अंगठी काढून द्या, तपासासाठी बघायची आहे, असे सांगत त्यांच्याकडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ₹४०,०००) घेऊन अंगठी खिशात ठेवली आहे, असे सांगत फसवणूक केली.
या प्रकरणी प्रभुलिंग राजुरे यांच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 204, 319(2), 3(5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
धाराशिवकरांनो सावधान, दिवाळीत चोरीचे प्रकार वाढू शकतात,
दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, या काळात काही कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी जातात.या संधीचा चोरटे लाभ घेऊन घरफोड्या करतात.तसेच वेगवेगळ्या पद्धतीने फसवणुकीचे प्रकार घडतात.अशा कोणत्याही संशयास्पद व्यक्तींशी संवाद साधताना जागरूक राहा आणि त्वरित पोलीसांना कळवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.