निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठी घडामोड,
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच ‘वेलकम’
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रमुख नेत्याच्या पक्षांतराची तयारी सुरू आहे. हा नेता मुलांसोबत पक्षांतर करणार असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांचे लवकरच वेलकम होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, या नेत्याचा निर्णय संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.
खरंतर या नेत्याने अनेक वर्षे आपल्या सध्याच्या पक्षाला बळकटी दिली. मात्र, अलीकडच्या काळात पक्षात त्यांची भूमिका दुय्यम ठरल्याने नाराजी वाढली असल्याचे बोलले जात आहे. निर्णय प्रक्रियेत त्यांना दूर ठेवण्यात येत असल्याने आणि नव्या नेतृत्वाकडून अपेक्षित सन्मान न मिळाल्याने त्यांनी आपले पुढील राजकीय पाऊल उचलण्याची तयारी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या नेत्याचे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांशी घट्ट संबंध असल्याने त्यांचा प्रभाव फक्त एकाच मतदारसंघापुरता मर्यादित नाही.त्यांनी पक्ष सोडल्यास संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या संपर्कात काही दुसऱ्या पक्षातील वरिष्ठ नेते गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने आहेत, आणि त्यांच्यातील चर्चाही अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते.
सत्तेच्या समीकरणात आपले राजकीय अस्तित्व मजबूत ठेवण्यासाठी अनेक नेते जिंकणाऱ्या पक्षाचा शोध घेत आहेत. त्यामुळे या संभाव्य प्रवेशाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पक्षांतरानंतर जिल्ह्यातील नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या आघाड्या तयार होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात आधीच अनेक नेत्यांनी गोट बदलले आहेत. काहींनी अजित पवार गटात प्रवेश केला, तर काहींनी काँग्रेसकडे झुकते माप दिले. अशा स्थितीत या नेत्याचा निर्णय राजकीय पातळीवर सर्वात मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. हा नेता कोण, तो कोणत्या पक्षात जाणार आणि या पक्षांतराचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार, या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत.
पक्षांतराचा फटका कुणाला..?
काही दिवसांपासून जिल्ह्यात पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. गेल्या महिन्यात भूम – परंडाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक प्रमुख नेत्यांनी गुड बाय केला आहे.त्यात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर यांच्यासह नळदुर्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांचा समावेश आहे.
पक्षांतराच्या या चर्चेत जिल्ह्यातील आणखी एक मोठा नेता असून, त्यांचा लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद, वाद निर्माण होत आहेत.
एखादा मोठा नेता अन्य पक्षातून आपल्या पक्षात आल्यानंतर आपले महत्व कमी होण्याची भीती संबंधित पक्षातील नेत्यांना असते. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत असतात.










