आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. दिवाळीचा दीपोत्सव सर्वत्र साजरा होत असताना पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी मात्र अजूनही अंधार आहे. मात्र, समाजातील काही दानशूर व्यक्ती पुढे येऊन शेतकऱ्यांच्या घरात मदतीच्या स्वरूपात छोटासा दिवा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशाच एका मदतीची पोस्ट आमदार कैलास पाटील यांनी समाजमाध्यमातून केली असून, एका माजी सैनिकाने पूरग्रस्त शेतकऱ्याच्या घरात लावलेल्या दिव्याची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. विशेष म्हणजे आमदार कैलास पाटील यांनीही या दिवाळीत कोणत्या ना कोणत्या प्रकारे संकटात असलेल्या कुटुंबाला मदत केली आहे.
आमदार कैलास पाटील यांच्या पोस्टमध्ये म्हणतात,
‘दिवाळीच्या या उत्सवाच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, माजी सैनिक सुभेदार शिवाजीराव सरडे यांनी माणुसकीचं एक असं उदाहरण घालून दिलं आहे, जे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.
कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथील शेतकरी संपत महेंद्र खोचरे हे केवळ ९० गुंठे जमिनीवर शेती करत आपला संसार चालवतात. याच शेतात त्यांनी या वर्षी मेहनतीने पिके घेतली होती. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील भीषण अतिवृष्टीमुळे सर्व पीक वाहून गेलं, आणि त्यांच्यासमोर एक मोठ संकट निर्माण झालं.
एक मुलगा आणि एक मुलगी दोघंही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत, पण परिस्थिती एवढी बिकट झाली की त्यांच्याकडून दिवाळीचा दिवासुद्धा लावला जाणार नव्हता. दरम्यान, धाराशिव शहरातील सांजा रोड येथील माजी सैनिक सुभेदार शिवाजीराव सरडे यांनी २५ सप्टेंबर रोजी एका वृत्तपत्रात ही बातमी वाचली.
देशासाठी आयुष्यभर झटलेल्या सुभेदार सरडे यांच्या मनाला ही गोष्ट असह्य झाली, त्यांनी त्याच दिवशी या शेतकरी कुटुंबाला मदत करण्याचा निश्चय केला.
यासाठी त्यांनी माझ्या पेन्शनमधून या शेतकऱ्याच्या घरी मी फुल न फुलाची पाकळी समजून आनंद नेऊ इच्छितो, असं सांगत त्यांनी दिवाळीसाठी मुलांकरिता १०,००० रुपये आणि कुटुंबासाठी २५,००० रुपये अशी एकूण ३५,००० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा विचार मांडला.
सुभेदार यांनी ही भावना ऐकून माझ्या मनालाही तीव्र स्पर्श झाला, माणुसकीची ही ज्योत अजून तेजोमय व्हावी या हेतूने, आपणही त्यात ५०,००० रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकूण ८५,००० रुपयांची मदत रविवारी सुभेदार सरडे साहेबांच्या हस्ते संपत खोचरे यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली.
जेव्हा सुभेदार साहेबांनी या कुटुंबाच्या हातात मदतीचा निधी दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, त्या क्षणी जाणवलं हीच खरी दिवाळी आहे. संपत खोचरे यांच्या कुटुंबियांना हा दिवाळीचा प्रकाश, संवेदनांचा आणि माणुसकीचा प्रकाश ठरो..’ आमदार कैलास पाटील यांच्या या भावनिक पोस्ट वर समाजमाध्यमातून खूप चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.