आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील वाघोली शिवारातील अजमेरा स्टोन क्रेशर येथे मजुरांच्या राहत्या शेडमध्ये झालेल्या हल्ल्यात एका मजुराचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामधे इतर दोघे जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,
आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग (रा. उपर हाटीया पिठ्याटोली, ता. जगन्नाथपुर, जि. रांची, झारखंड; ह.मु. अजमेरा स्टोन क्रेशर, वाघोली, जि. धाराशिव) यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता मजुरांच्या राहत्या पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली.
लैंगिकतेवरून चिडविल्याच्या कारणावरून आरोपीने सुनिल गांगु कुजुर (वय 31 वर्षे) याच्या डोक्यात चौकोनी लोखंडी पाईपने वार करत त्याचा जागीच खून केला. तसेच धनेश खासा मुंडा याच्यावरही त्याने त्याच पाईपाने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादी मागन करोम लोहरा (वय 67 वर्षे) हेसुद्धा जखमी झाले.
घटनेनंतर फिर्यादी मागन लोहरा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 103(1), 109(1) व 118(1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वाघोलीतील मजुरांच्या वसाहतीत घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








