पाच हजार सामायिक खातेदारांचे अर्ज विमा कंपनीने चार महिन्यांनी केले बाद
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
यावर्षी धाराशिव जिल्ह्यात विक्रमी पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शासनाकडून अतिवृष्टीचे अनुदान मिळत असतानाच आता शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून भरघोस पिक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, पिक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सामायिक खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून, विमा कंपनीने पिक विमा भरल्यानंतर तब्बल चार महिन्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज बाद ठरवले आहेत.
त्यामुळे ऐन पिक विमा मिळण्याच्या वेळीच कंपनीने अर्ज बात करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रश्नाकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना राजकीय नेत्यांचे लक्ष आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 5000 शेतकरी यंदा पिक विमा मिळण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून पीक संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना देशभर राबवली जाते. यावर्षी केंद्र सरकारने पिक विमा योजनेच्या निकषात मोठे बदल केल्यामुळे तसेच राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यामुळे खरीप 2025 पासून शेतकऱ्यांना पिक विम्याचा हप्ता मोठ्या प्रमाणात भरावा लागला. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र जवळपास साडेचार लाख हेक्टर इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन या पिकाचा विमा मोठ्या प्रमाणात भरतात.
यावर्षी राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 1160 रुपये प्रीमियम भरून सोयाबीन पिकाचा विमा काढावा लागला. यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात धाराशिव जिल्ह्यात विक्रमी म्हणजे सरासरीच्या 162 टक्के पाऊस पडला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाखो हेक्टर वरील पिके दोन महिने पाण्यातच असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान सध्या वितरित करण्यात येत असून शेतकऱ्यांना अनुदानासोबतच पीक विम्याची देखील प्रतीक्षा आहे. धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 40 हजार 495 शेतकऱ्यांनी 3 लाख 53 हजार 833 हेक्टर क्षेत्राचा पिक विमा भरला आहे. यामध्ये सामायिक खातेदारांची संख्या देखील हजारोंच्या घरात आहे. पीक विमा भरून चार महिने होऊन गेले असून आता विमा कंपनीने जिल्ह्यातील जवळपास 5000 शेतकऱ्यांचे अर्ज अचानक बाद केल्याचे सीएससी चालकांना आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने कळवले आहे.
सीएससी चालकांची प्रशासनाकडे धाव –
आयसीआयसीआय लोंबार्ड या पीक विमा कंपनीने मागील आठवड्यात सीएससी चालकांनी सामाईक खातेदारांचे अर्ज पिक विमा योजनेतून बाद केल्याचे अचानक कळवल्यानंतर सीएससी चालकांनी प्रशासनाकडे धाव घेऊन विमा कंपनीची तक्रार केली. ज्या सामाईक खातेदारांचा पिक विमा सीएससी चालकांनी भरला होता त्यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी विमा कंपनीने 17000 सामाईक खातेदारांची नावे पाठवून शेतकऱ्यांकडून बाँडवर शपथपत्र करून घेऊन ते अपलोड करण्यास सांगितले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी अडीचशे ते तीनशे रुपये खर्च करून बाँड तयार करून ते सीएससी चालकांकडून अपलोड केले.
कागदपत्रे अपलोड करूनही अर्ज बाद –
तीनशे रुपये खर्च करून आणि बाँड पेपर तयार करूनही कंपनीने कुठलेच ठोस कारण न देता सामाईक खातेदारांचे पाच हजार अर्ज बाद केले आहेत. कृषी विभागाकडून कंपनीला संपर्क साधून अर्ज बाद न करता कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे. मात्र, विमा कंपनी मनमानी करून अर्ज बाद करण्यावर ठाम असल्याचे कळते.
पिक विमा मिळण्याच्या वेळीच कंपनीची खेळी –
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 17000 रुपये पिक विमा देण्याचा शब्द दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात पिक कापणी प्रयोग देखील पूर्ण झाले असून आता अंतिम आकडेवारी काढण्याचे काम कृषी विभाग करत आहे. पुढील दोन महिन्यात शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करावा लागणार आहे आणि अचानक हजारो अर्ज बाद करून विमा कंपनी स्वतःचे पैसे वाचवत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
प्रशासनासह राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष –
जिल्ह्यातील जवळपास पाच हजार सामायिक खातेदारांची नावे विमा कंपनीकडून अचानक रद्द करण्यात आल्यानंतर प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी यावर शेतकऱ्यांच्या बाजूने विमा कंपनीला जाब विचारायला हवा. मात्र, तसे होताना दिसत नाही. सीएससी केंद्र चालकांनी ज्या शेतकऱ्यांची नावे पिक विमा योजनेतून बाद केली आहेत त्यांची नावे कृषी विभागाला दिली आहेत. या प्रश्नावर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्वतः आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला जाब विचारायला हवा अशी मागणी शेतकरी करत आहेत.









