आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना थेट ‘मातोश्री’ कडून दिलासा मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ‘जाणीव ट्रस्ट’च्या माध्यमातून पूरग्रस्त भागात मदत सामग्री पाठवण्यात येत आहे.
या उपक्रमाचा पुढाकार शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनी घेतला असून, मदत वितरणासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. पूरामुळे भूम आणि परंडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे पाठवण्यात येणारी मदत केवळ धान्यापुरती मर्यादित नसून, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबांना आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक मदत किटचे वजन 23 किलो असून त्यात तांदूळ, गव्हाचे पीठ, रवा, साखर, दुधाची भुकटी, तूप, शेंगदाणे, मसाल्याचे पदार्थ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या कीटमुळे पूरग्रस्त नागरिकांना सण साजरा करण्यासाठी थोडाफार दिलासा मिळणार आहे.
शिवसेना नेते आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत भूम व परंडा तालुक्यातील सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये या मदतीचे वितरण करण्यात येणार आहे. मातोश्रीकडून आलेली ही मदत पूरग्रस्तांसाठी आधाराचा हात ठरणार असून, या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला जात आहे.