सूरज बागल /आरंभ मराठी
तुळजापूर ;
तुळजाभवानी मंदिरातील सिंहगाभाऱ्यातील जीर्णोद्धार कामामुळे गेले वीस दिवस बंद असलेले श्री तुळजाभवानी मातेचे धर्मदर्शन व पेडदर्शन उद्या, गुरुवार, २१ ऑगस्टपासून पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानतर्फे देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरातत्त्व विभागामार्फत मंदिरात जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामाच्या कारणास्तव १ ऑगस्टपासून धर्मदर्शन व पेडदर्शन बंद ठेवण्यात आले होते. सुरुवातीला दहा दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती, मात्र पुढे हा कालावधी वाढवून 20 दिवस करण्यात आला.
या काळात हजारो भाविकांना देवीचे जवळून दर्शन घेता आले नव्हते. मात्र आता उद्यापासून भाविकांना नेहमीप्रमाणे धर्मदर्शन व पेडदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच मंदिरातील इतर सर्व धार्मिक विधी आणि पूजा-अर्चा देखील नियमितपणे सुरू राहतील, असे मंदिर संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.