धाराशिवच्या रस्ते कामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार
दत्ता कुलकर्णी
धाराशिव,
धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नाल्यांच्या कामांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थगिती दिल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडून ही स्थगिती देण्यात आली असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही याबाबत दाद मागितली असून, लवकरच तोडगा निघून कामे सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सततच्या प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून ११७ कोटी रुपयांचा निधी धाराशिव शहरातील रस्ते व नाल्यांच्या विकासासाठी मंजूर झाला. १६ ऑक्टोबर रोजी कार्यारंभ आदेश निघाले, २८ ऑक्टोबर रोजी कामांना प्रत्यक्ष प्रारंभही झाला. पण त्याच दिवशी पालकमंत्री सरनाईक यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे कामांना स्थगिती दिली.
कुलकर्णी म्हणाले, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शहराच्या विकासाला विलंब लावणारे राजकीय विरोधक जनतेच्या हिताविरुद्ध वागत आहेत. हे काम सुरू झाले असते, तर त्यांच्या अकार्यक्षमतेचा पर्दाफाश झाला असता. त्यामुळेच त्यांनी चुकीची माहिती देऊन विकासकामात अडथळा आणला.
धाराशिव शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून, एका तरुणाचा जीवही गेला आहे. वृद्ध, महिला, शाळकरी मुले प्रवास करताना अक्षरशः हैराण झाली आहेत.
शहराच्या जनतेच्या हिताचा विचार करून रस्ते व नालींच्या कामांवरील स्थगिती त्वरित उठवावी. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत दाद मागितली असून, विकासकामे लवकरच सुरू होतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.








