धाराशिवमध्ये कोणावर कारवाई करणार?
आज धाराशिव बस स्थानकाची घेणार झाडाझडती
आरंभ मराठी / धाराशिव
सोलापूर आगार व्यवस्थापकावर झालेल्या तात्काळ निलंबनाच्या कारवाईचा थेट परिणाम धाराशिव एसटी विभागातही जाणवू लागला आहे. सोलापूर येथील कारवाईची माहिती समजताच धाराशिव बस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः खडबडून जागे झाले. काल संपूर्ण बस स्थानकात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली.
आज पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव बस स्थानकाला अचानक दौरा असल्याने अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड धावपळ सुरू आहे. अस्वच्छता, प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष आणि सतत येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कारवाई होऊ नये यासाठी अधिकारी-कर्मचारी अलर्ट मोडवर दिसत आहेत. अचानक सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
धाराशिव येथील आगार व्यवस्थापकाविरोधात कर्मचारी आणि प्रवासी दोघेही सातत्याने तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. बससेवा विस्कळीत होणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, प्रवाशांना दमदाटी करणे, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे असे गंभीर आरोप त्यांच्या विरोधात करण्यात येत आहेत. चार दिवसांपूर्वी डिझेलअभावी तब्बल पाच तास बस सेवा ठप्प होती.
काल शुक्रवारीदेखील २५ ते ३० फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. बसच मिळत नसल्याने काही प्रवाशांना आगार व्यवस्थापकाकडून खाजगी वाहनाने जा असा अजब सल्ला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सात महिने झाले तरी नवीन बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. कॅन्टीन चालकाला मदत करण्यासाठी जाणूनबुजून पाण्याची सोय रोखल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. कॅन्टीनमध्ये १५ रुपयांच्या नाथजल या मिनरल वॉटर बॉटलला २० रुपये वसूल केले जातात.
बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था कायम असून याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. तक्रार पेटीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक प्रवाशांनी शेकडो तक्रारी टाकल्या असून, त्या तक्रारी आगारप्रमुखांकडून केराच्या टोपलीत टाकल्या जातात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस सेवा विस्कळीत झाल्यास आगार व्यवस्थापकांना भेटण्यास सुरक्षा रक्षकांकडून मज्जाव केल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत.
त्यामुळे प्रवासी संतप्त असून व्यवस्थापकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. सोलापूर आगार व्यवस्थापकाच्या निलंबनानंतर आता धाराशिव एसटी विभागावरही कारवाईची शक्यता अधिक वाढली आहे.
धाराशिवमधील वाढत्या तक्रारी, सतत विस्कळीत होणारी सेवा आणि व्यवस्थापनातील अनियमितता पाहता, पालकमंत्री आजच्या पाहणीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









