राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत बांधकामास ४ कोटी ७५ लाख मंजूर
इमारतीसाठी २० लाख तर नागरी सुविधा केंद्रासाठी ५ लाख रुपये मिळणार
आरंभ मराठी / धाराशिव
केंद्र सरकारच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत २०२५-२६चा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींना हक्काची इमारत मिळणार आहे.
त्यासाठी शासनस्तरावर नागरी सुविधा केंद्रासाठी ५ लाख तर इमारत बांधकामासाठी २० लाख अशी एकूण २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये उमरगा तालुक्यातील ७, कळंब तालुक्यातील ४, तुळजापूर ४, लोहारा २, धाराशिव आणि परंडा प्रत्येकी १ अशा एकूण १९ ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार आहेत.
ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी संसदीय समितीच्या सूचनांनुसार ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा घटकांतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत आणि त्यासोबत नागरी सुविधा केंद्र खोली (सीएससी) मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबविले जात आहे.
ही योजना केंद्र पुरस्कृत असून यामध्ये केंद्राचा हिस्सा ६०% तर राज्याचा हिस्सा ४०% आहे. पंचायती राज मंत्रालयाच्या सेंट्रल एम्पॉडर्ड कमीटी च्या दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत बांधकामासाठी निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या निकषानुसार नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली (सीएससी) बांधकामासाठी एकूण २५ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. यात ग्रामपंचायत इमारत बांधकामसाठी २० लाख रुपये तर नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामसाठी रु.५ लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये नागरी सुविधा केंद्र खोली (सीएससी) साठी स्वतंत्र प्लॅन निर्गमित केला आहे.
तसेच सन २०२५-२६ च्या आराखड्यानुसार या खोलीकरिता ५ लाख रुपये इतका स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देत असल्याने हे काम स्वतंत्ररित्या अथवा ग्रामपंचायत इमारतीच्या लगतच्या जागेत उपलब्धतेनुसार करावे लागणार आहे.
नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र बांधकाम केले नसल्यास ५ लाख रुपयांचा हा निधी खर्च करता येणार नाही, अशी अट ठेवण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम हाती घेण्यासाठी जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यात येऊन बांधकामासाठी कार्यादेश देऊन बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे.
जिल्ह्याला ४ कोटी ७५ लाख रुपये मिळणार
धाराशिव जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या बांधकामासाठी या योजनेतून निधी मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायततीला २५ लाख रुपये मिळणार आहेत. १९ ग्रामपंचायतींच्या बांधकामासाठी या योजनेतून ४ कोटी ७५ लाख रुपये निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे.
या ग्रामपंचायतींचे होणार बांधकाम
गाव – तालुका – लोकसंख्या
कसगी – उमरगा – ४६६१
येणेगुर – उमरगा – ६७४७
आलुर – उमरगा – ७६४०
चिंचोली भुयार – उमरगा – ३१५४
कुन्हाळी – उमरगा – ३०५४
बलसुर – उमरगा – ६२४०
बेलंब – उमरगा – ४१६१
कनगरा – धाराशिव – ३०३०
आंदोरा – कळंब – ३६२१
गौर – कळंब – ३२२६
पाडोळी – कळंब – ३२३३
लोहटा पूर्व – कळंब – ३००२
चिंचपूर (बु.) – परंडा – ३६७१
धानुरी – लोहारा – ३८८२
आष्टाकासार – लोहारा – ६१९०
जळकोट – तुळजापूर – ७९७१
किलज – तुळजापूर – ३६४७
खुदावाडी – तुळजापूर – ३४९२
चिवरी – तुळजापूर – ३२४८