आरंभ मराठी / तुळजापूर
ऑनलाइन गेमच्या माध्यमातून जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तुळजापूर शहरातील बाप लेकाला तब्बल 17 लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंबंधी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वीच ऑनलाइन गेमवर बंदी घातलेली असतानाच ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी कालीदास लिंबाजी गवळी (वय 54 वर्षे, रा. शुक्रवार पेठ, कणे गल्ली, तुळजापूर) यांचा मुलगा कृष्णा याला जास्त पैशाचे अमिष दाखवून व शासनाची ऑनलाईन गेमची बंदी असताना सुध्दा exchange.com अशी लिंक तयार करुन मोबाईल नंबरवरून पाठवून दिली होती.
आरोपींनी वेगवेगळ्या आठ नंबरवरून ही लिंक पाठवली होती. यामध्ये 9091915891, 9561463808, 8485017490, 8766406507, 8446223584, 8010781839, 8446964554, 73918220088 या मोबाईल नंबरच्या व्हॉटसअपवरून लिंक पाठवली. या लिंकद्वारे कालिदास लिंबाजी गवळी आणि त्यांचा मुलगा कृष्णा याची तब्बल 16,85,498 रुपयांची ऑनलाइन फसवणुक केली.
याप्रकरणी कालीदास गवळी यांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे भा.न्या.सं.कलम 78, 356(2) सह कलम 66 (सी) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना सायबर पोलिसांकडून आणि सरकारकडून वारंवार दिल्या जात असतानाही जास्त पैशाच्या आमिषाला भुलून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. केंद्र सरकारने यावर आळा बसावा यासाठी मागील आठवड्यात ऑनलाइन गेम ऍप वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.