ठेकेदाराचे 12 कोटी रुपये पालिकेकडे थकले, स्वच्छता कशी होणार..?
आरंभ मराठी / धाराशिव
ऐन दिवाळीच्या सणासुदीत धाराशिव शहरातील नागरिकांना दुर्गंधी, कचरा आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून रस्ते, नाले आणि चौकांत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.घंटागाड्या बंद असून, नागरिकांची अडचण झाली आहे.
स्वच्छता करणाऱ्या ठेकेदार कंपनीला नगरपालिकेकडून पेमेंट न मिळाल्याने कंपनीने कामबंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच विभागांत सफाईची कामे ठप्प झाली आहेत. नाल्यांमधील घाण साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.दरम्यान, स्वच्छता ठेकेदाराचे पालिकेकडे सुमारे 12 कोटी रुपये थकले आहेत.
तीन वर्षांपासून धाराशिव नगरपालिकेत लोकनियुक्त मंडळ नसल्याने अधिकाऱ्यांचेच राज्य सुरू आहे. मात्र अधिकारी केवळ तात्पुरती मलमपट्टी करत असून शहराच्या दुरवस्थेवर कोणीही ठोस उपाय करत नाही.
2020 पासून हरीकल्याण येलगट्टे, वसुधा फड आणि सध्या नीता अंधारे यांच्या कारकीर्दीत पालिकेवर प्रशासन चालले. परंतु या सर्व काळात नागरिकांना समाधानकारक सुविधा मिळाल्या नाहीत. उलट आर्थिक गैरव्यवहार, चुकीच्या कामकाजाच्या पद्धती आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पालिका गाजत आहे.
कर वसुली जोरात,सुविधांचे काय?
शहरातील नागरिकांकडून कर वसुली मात्र मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.सवलती सांगून फलक लावून पालिका वसुली करत आहे. तरीही पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे. कर द्या, सुविधा विसरा, अशी नागरिकांची अवस्था झाली आहे.
निवडणुका तोंडावर, उत्तरदायित्व कोणाचे?
नगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असले तरी शहराच्या या स्थितीकडे कोणी लक्ष देत नाही. उद्या गळ्यात रुमाल टाकून मतांची भीक मागण्याआधी आजच नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नांचा जाब नगरपालिकेला विचारायला हवा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.