निवडणुकीच्या तोंडावर खांदेपालट, नाराज संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकरांनी पक्ष सोडला
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये भाकरी फिरवण्यात आली आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्या आदेशाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांना नियुक्तीपत्र दिले. या निवडीबद्दल डॉ. पाटील यांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कालच बारामती येथे जाऊन जिल्ह्यातील पक्ष नेतृत्व बदलाची मागणी केली होती त्यानंतर अवघ्या 24 तासात नेतृत्व बदलण्यात आले असून,त्यामुळे नाराज झालेल्या जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांनी पक्ष सोडला आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी 6 वर्षापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यांना 2019 मध्ये धाराशिव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, ही संधी गेल्यानंतरही त्यांनी पक्षाचे निष्ठापूर्वक काम सुरू ठेवले. डॉ.पाटील यांचा जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागात उत्तम जनसंपर्क असून, वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मजबूत पकड आहे. पक्षात कोणतेही महत्वाचे पद नसतानाही त्यांनी पक्षासाठी योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
त्यांचे पक्षातील योगदान विचारात घेऊन पक्षाने गेल्यावर्षी प्रदेश सरचिटणीसपदाची माळ गळ्यात टाकली होती. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. आजच पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेऊन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नेतृत्व बदलाची मागणी केली होती. त्यामुळे हा बदल झाला असून, डॉ.पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.









