आरंभ मराठी / धाराशिव
खरीप 2020 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या भरपाईसंदर्भात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेल्या निकालानंतर आता विमा कंपनीकडून प्रत्यक्षात पैसे कधी मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना एकूण 225 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये विमा कंपनीने उच्च न्यायालयात जमा केलेले 75 कोटी रुपये आणि त्यावरील 17.93 कोटी व्याज अशी 92.93 कोटी रुपयांची रक्कम 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
तसेच राज्य सरकारकडून विमा कंपनीला देय असलेले उर्वरित 134 कोटी रुपये 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवरून विमा लाभार्थींच्या खोट्या याद्या फिरत असल्याचे समोर येत आहे.
प्रशासनाने अशा यादींकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभागाकडून अधिकृत लाभार्थी याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या 12 डिसेंबरपर्यंत याद्या तयार होणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा न्याय मिळाला आहे. 2020 मधील अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीबाबत विमा कंपनीने 500 कोटींपेक्षा जास्त भरपाई द्यायची गरज असूनही फक्त 288 कोटी 77 लाख रुपयांचेच वितरण केले होते.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून 225 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले होते; मात्र विमा कंपनीने त्याची अंमलबजावणी केली नव्हती.
या अन्यायाविरोधात गेल्या तीन वर्षांपासून प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होते. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 9 हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण निधी जमा झाल्यानंतर 20 डिसेंबरनंतर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे आर्थिक वितरण वेळेत आणि पारदर्शकपणे होण्यासाठी प्रशासनाकडून तयारी वेगाने सुरू आहे.









