आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील 140 कोटींच्या नगरोत्थान योजनेतील कामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणात शिवसेना पक्षाचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे थेट तक्रार दाखल करणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी सांगितले की, मुख्याधिकारी यांनी टेंडर प्रक्रियेत केलेल्या गैरप्रकारांचे ठोस पुरावे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहेत.
राज्य प्रकल्प समितीने दिलेल्या सूचनांचे पालन न करता, मुख्याधिकारी यांनी बीड कॅपॅसिटी व बीड व्हॅलिडिटी चुकीच्या पद्धतीने ठरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साळुंखे यांनी म्हटले की, टेंडर स्क्रुटनी प्रक्रियेतील एकाही कागदावर मुख्याधिकाऱ्यांची सही नाही, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेरनिविदा काढण्याच्या दिलेल्या सूचनाही त्यांनी दुर्लक्षित केल्या. निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या गुत्तेदाराने सध्याच्या कामांची यादी सादर करण्याचा नियमही मोडला, तरीही त्याला मंजुरी देण्यात आली.
आरोपानुसार संबंधित गुत्तेदाराकडे जवळपास 300 कोटींची कामे सुरू आहेत, मात्र ही माहिती जाणीवपूर्वक दडवण्यात आली. इतकेच नव्हे, तर मुख्याधिकारी आणि गुत्तेदार यांच्यात दोन कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारावर मुख्याधिकारी नीता अंधारे यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे शिष्टमंडळ उद्या मुंबईत करणार आहे. धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असून, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोटाळ्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.









