अंगणवाडी सेविकांच्या मदतीने मातृवंदना योजनेतील शेकडो महिलांची फसवणूक
परप्रांतीय सायबर भामट्यांचा नवा फंडा; आलूर परिसरात खळबळ
शेखर कोठे / आरंभ मराठी
आलूर :
उमरगा तालुक्यातील आलूर व परिसरातील ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या गरोदर महिलांची अंगणवाडी सेविकांच्या नावाने सायबर भामट्यांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला आहे. कॉन्फरन्स कॉलवर सरकारी अधिकारी असल्याचे सांगून महिलांकडून बँक खाते, फोनपे नंबर व ओटीपी यांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यांमधील रक्कम उकळण्यात आली. या घटनेमुळे आलूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गावातील लाभार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परप्रांतीय भामट्यांनी स्थानिक अंगणवाडी सेविकांचा उपयोग महिलांचा विश्वास संपादित करण्यासाठी कॉल केला.
प्रथम या सेविकांना तुमच्या गरोदर लाभार्थ्यांविषयी तक्रारी आल्या आहेत अशी भीती दाखवण्यात आली.
त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांना फोन करून सांगितले, वरचे अधिकारी तुमच्याशी बोलतील, त्यांनी विचारलेली सगळी माहिती द्या.
यानंतर कॉन्फरन्स कॉलवरून सायबर भामटे जोडले गेले. त्यांनी स्वतःची अधिकारी म्हणून ओळख सांगितली आणि
महिलांकडून गर्भावस्थेची माहिती, रेशन व अन्य सुविधांबाबत चौकशी केली.त्यानंतर मातृवंदना योजनेचे पैसे मिळाले का?, असे विचारत,
मिळाले नसतील तर आम्ही आत्ताच पाठवतो, लिंक ओपन करा, असे सांगण्यात आले.
अनेक महिलांनी लिंक उघडताच त्यांच्या बँक खात्यांतील रक्कम काही क्षणांत गायब झाली.हा प्रकार लक्षात आल्यानंतर आलूर परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक महिलांच्या खात्यातील लाखो रुपये काही क्षणात गायब झाले असून, महिलांच्या संदर्भातील आधार, पॅन,बँकेचा डेटा मिळवून अत्यंत शिताफीने आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार घडल्याने महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंगणवाडी सेविकेचे नाव फोनवर घेतल्यानेच महिलांनी कॉलवरील व्यक्तींवर विश्वास ठेवला गेला, असे अनेक महिलांनी आरंभ मराठीला सांगितले.सेविकेने सांगितले नसते, तर आम्ही माहितीच दिली नसती.
सायबर भामट्यांनी गावागावात अनेक कॉल्स करून लाभार्थ्यांच्या खात्यांवरील रक्कम उकळली आहे.
काही महिला सतर्क राहिल्याने वाचल्या, पण अनेकांच्या पैशांचा चुराडा झाला.
अंगणवाडीत भ्रष्टाचाराचा वास?
या प्रकरणातून अंगणवाड्यांमधील रेशन व अन्य सुविधा वितरणातील अनियमिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही ठिकाणी फक्त निवडक महिलांनाच रेशन दिले जाते, अशी माहिती समोर आली आहे.
सायबर भामट्यांनी याच कारणाचा फायदा घेत सेविकांना धमकावले.
तुमच्याबाबत लाभार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत, आम्ही चौकशी करत आहोत,असे सांगत त्यांचा वापर करण्यात आला.
आपलीच गडबड झाकण्यासाठी काही सेविकांनी महिलांना वरच्या अधिकाऱ्यांना विचारलेली सगळी माहिती द्या, असा सल्ला दिला,
आणि यामुळेच महिलांचा विश्वासघात झाला, असा नागरिकांचा आरोप आहे.
तात्काळ चौकशी करा,महिलांची मागणी
या प्रकाराची चौकशी करून सायबर टोळी, अंगणवाडी सेविका आणि बँक व्यवहाराचा संबंध काय याचा तपास करावा,
अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
संबंधित सेविकांची जबाबदारी ठरवून, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी कडक मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी नागरिकातून करण्यात येत आहे.