आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील व डॉ. साक्षी खरबंदा यांचा विवाह सोहळा तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील प्रसिद्ध मुदगलेश्वर मंदिरात शनिवारी मंगलमय वातावरणात पार पडला. कोणताही दिखाऊ थाटमाट न करता, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाण ठेवत, मोजक्याच उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नेत्या पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रताप सरनाईक आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
दरम्यान, पाटील परिवाराने अनावश्यक खर्च, थाटमाट टाळत सोहळा साधेपणात आयोजित केला. मात्र, फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार असून, धाराशिव तालुक्यातील सोहळ्यात चि. मल्हार पाटील यांच्या लग्नाचे रिसेप्शन (स्नेहभोजन) ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली.
आमदार पाटील म्हणाले की,चि. मल्हार आणि चि. सौ. का. डॉ. साक्षी यांच्या विवाहाला येऊन शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे, सहकाऱ्यांचे, मित्रपरिवाराचे व नातेवाईकांचे मनःपूर्वक आभार. धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर साधेपणात पार पडलेल्या या विवाहासाठी सर्वांचे प्रेम व आशीर्वाद लाभला, हीच मोठी संपत्ती आहे.









