अगोदर सुशिक्षित बेकार आता प्रशिक्षणार्थी बेकार
योजनेस मुदतवाढ मिळावी यासाठी प्रशिक्षणार्थींचा मूक मोर्चा
आरंभ मराठी / धाराशिव
राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू करतानाच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना या नावाने एक नवीन योजना सुरू केली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला लाडका भाऊ योजना असे नाव दिले होते. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुण – तरुणींना शासकीय कार्यालयात सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून महिना दहा हजार रुपये मानधनावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
या योजनेला धाराशिव जिल्ह्यात तुफान प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ४ हजार ९४९ तरुण तरुणींनी या योजनेतून प्रशिक्षणार्थी म्हणून वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात काम केले. परंतु आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा मोठा प्रश्न या तरुण – तरुणींसमोर उभा राहिला आहे. यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सहाशे प्रशिक्षणार्थीनी गुरुवारी ( दि.१३) मूक मोर्चा काढून या प्रश्नाकडे शासनाचे आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
शहरातील लेडीज क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात संपणार असून प्रशिक्षणार्थीवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.
योजनेच्या नियमावलीतील मुद्दा क्र 4.5 नुसार या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पुर्ण केलेले उमेदवार संबधित आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छा असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दुष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील असे नमुद करण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व प्रशिक्षणार्थीनी सरकारी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच सध्याच्या मानधनात वाढ करावी तसेच विविध शासकीय नोकर भरतीत युवा प्रशिक्षणार्थींना दहा टक्के आरक्षण द्यावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास पुढील आठवड्यात साखळी उपोषणाच्या माध्यमातून हा लढा दिला जाईल असेही निवेदनात म्हंटले आहे.
सरकारने पुन्हा बेरोजगार करू नये
मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शिराढोण येथील पी.एम.श्री जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत झाले. आता सहा महिन्यांचा कालावधी संपल्याने शासनाकडून आम्हाला कमी करण्यात येणार असल्याने आता परत सुशिक्षित बेरोजगार म्हणून घरी बसावे लागणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत मी माझे काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडले आहे त्यामुळे शासनाने हा प्रशिक्षण कालावधी वाढवून देणे गरजेचे आहे.
मनीषा प्रदीप यादव,
शिराढोण.
सरकारने एक वर्ष मुदतवाढ द्यावी
मी शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मुरुम येथे प्रशिक्षणार्थी म्हणून 15 ऑगस्ट 2024 साली रुजू झालो होतो. मला फक्त सहा महिने मिळाले परंतु किमान वर्षभर तरी शासनाने संधी द्यायला हवी होती असे वाटते. आता पुन्हा एकदा आम्ही बेरोजगार झालो. शासनाने एक वर्षाची मुदतवाढ देऊन मानधनात वाढ करावी.
सचिन नरसिंग राठोड
मुरूम.
पुन्हा बेरोजगार होऊन आम्ही जायचे कोठे?
मी ग्रामीण रुग्णालय मुरूम येथे DEO या पदावर युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे. माझा कार्यकाल 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे. नंतर काय करायचे हा प्रश्न मला पडला आहे. सरकारने यावर विचार करावा. या योजनेद्वारे आशेचा एक किरण दिसत होता तो देखील आता नाहीसा होत आहे.
आमच्या वयाचा विचार करता यापुढे नोकरी मिळणे कठीण आहे त्यामुळे शासनाने आम्हाला कंत्राटी पध्दतीने रुजू करून घ्यावे.
प्रमोद महादेव गायकवाड
मुरूम.