आरंभ मराठी / भूम
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याच्या असंख्य घटना समोर येत असतानाच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूम तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या मात्रेवाडी येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मात्रेवाडी येथील लक्ष्मण बाबासाहेब पवार या 42 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. पवार यांची शेतजमीन नदीच्या काठावर आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने त्यांच्या शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय शेतजमीन देखील खरवडून गेल्याची माहिती मिळाली.
झालेल्या नुकसानीमुळे ते तणावात असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले आहेत. पवार यांच्यावर ट्रॅक्टरचे काही कर्ज असल्याचेही समोर आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून त्यांनी कर्जावर ट्रॅक्टर घेतले होते.
त्या ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडणार या विवंचनेत ते होते. फक्त दोन एकर शेतीवर गुजराण करत असलेले लक्ष्मण पवार यांनी पावसामुळे सर्वच उध्वस्त झाल्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतला. झालेल्या नुकसानीतून बाहेर कसे पडणार हा प्रश्न गेले दोन दिवस त्यांना सतावत होता. भूम, परंडा, वाशी, आणि कळंब या चार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, या भागातील शेतकरी उन्मळून पडला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री जिल्ह्याचा पाहणी दौरा करत असले तरी शेतकऱ्यांना ठोस मदतीची सध्या गरज व्यक्त केली जात आहे. शेतकरी नैतिकदृष्ट्या खचला असून, त्याला नैतिक आणि आर्थिक पाठबळ देण्याची गरज व्यक्त होत आहे.
झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर पीक पाण्यात असून, भविष्य अंधकारमय झाले आहे. यातूनच शेतकरी टोकाचा निर्णय घेत असून, प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा विश्वास दिला तरच शेतकरी उभा राहील अन्यथा अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेल्या लक्ष्मण पवार यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे.
कुटुंबीयांनी प्रेत स्वीकारण्यास नकार दिला असून, संतप्त झालेले गावकरी देखील प्रशासन आणि सरकारबद्दल रोष व्यक्त करत आहेत. लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.