कधी वंचित,कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेस.. सूत कसे जुळणार ?
आरंभ मराठी / धाराशिव
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून अशोक जगदाळे यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांच्या या प्रवेश सोहळ्याला जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डावलून झालेल्या या प्रवेशामुळे, जगदाळेंचा पक्षप्रवेश स्थानिक स्तरावर टिकेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून प्रवेशाचा मार्ग निवडला. त्यामुळे काँग्रेसमध्येही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच गटबाजी आणि अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार, हे स्पष्ट होत आहे.
अशोक जगदाळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अंतर्गत वादाचा सामना करावा लागला.
आता २०२९ ची विधानसभा लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करून जगदाळे यांनी नवीन राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू केली असली, तरी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत नसलेला समन्वय त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरणार आहे.
जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी तीव्र असून, नव्याने आलेल्या जगदाळेंना स्वीकारणे अनेकांसाठी अवघड ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगदाळेंच्या काँग्रेसमधील भवितव्याबद्दलच नव्हे तर त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कधी वंचित बहुजन आघाडी,कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी काँग्रेस पक्ष,असा सातत्याने पक्ष बदलाचा त्यांचा मार्ग त्यांना राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उचित ठरेल का हे येणारा काळच सांगणार आहे.








