आरंभ मराठी / धाराशिव
न्यायालयीन अपील दाखल झालेल्या धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केला. धाराशिव नगरपालिके प्रमाणेच राज्यातील 25 नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये सुधारित कार्यक्रमानुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
मात्र, निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया 3 डिसेंबरला करायची की नाही याबद्दल स्पष्ट निर्देश न दिल्यामुळे प्रशासन देखील चिंतेत आहे. निवडणूक आयोगाने सुधारित आदेशात मतमोजणी प्रक्रियेबद्दल स्पष्ट सूचना दिल्या नसल्या तरी प्रशासकीय पातळीवरून मात्र, मतमोजणी प्रक्रियेची तयारी सुरु करण्यात आली आहे. न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे स्थगित झालेल्या धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी उशिरा जाहीर केला.
पाच दिवसांपूर्वी या जागांवरील निवडणुकांना स्थगिती लागू करण्यात आली होती. त्यामुळे उमेदवार, प्रशासन व नागरिकांचे लक्ष या सुधारित कार्यक्रमाकडे लागले होते. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे बाधित झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे त्याप्रमाणे ४ डिसेंबर रोजी कार्यक्रम जाहीर होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२५, दुपारी ३.०० वाजेपर्यंत असेल.
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक : ११ डिसेंबर २०२५ आणि मतदानाचा दिनांक :
२० डिसेंबर २०२५
(सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०) असेल तर मतमोजणी व निकाल
२१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होईल. दरम्यान, २ डिसेंबर रोजी इतर प्रभागांमध्ये होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबरलाच नियोजित कार्यक्रमानुसार पूर्ण होणार की ती मतमोजणी देखील २१ डिसेंबर रोजी होणार याबद्दल स्पष्ट निर्देश न मिळाल्यामुळे प्रशासनाची देखील मोठी अडचण झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने रविवारी रात्री उशिरापर्यंत व्हीसी घेऊन निवडणूक कार्यक्रम व्यवस्थित राबविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम दिला आहे. मात्र, सुधारित निवडणूक कार्यक्रम दिलेल्या ठिकाणी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी करायची की नाही? किंवा सुधारित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर रोजी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करायची यासंदर्भात नेमके निर्देश दिले नाहीत.
त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. दिनांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले नसले तरी अगोदर ठरल्याप्रमाणे निवडणूक विभागाकडून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.









