आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात काही वर्षांपर्यंत क्रमांक एकवर असलेल्या राष्टवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत दोलायमान झाली असून, सत्ता असूनही पदाधिकारी संघटन वाढीसाठी योगदान देण्याऐवजी स्वमग्न आहेत.
पक्षाचा एकही व्यापक कार्यक्रम नाही की सत्तेच्या माध्यमातून जनतेची कामे होत नाहीत. उलट ठेकेदारीसाठी पक्षावर दबाव आणून कामे करून घेतली जात आहेत.
प्रमुख पदाधिकाऱ्यांचे कामकाज हे पक्षाच्या अपेक्षांच्या अगदी विरोधात असून, त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. संघटनात्मक पातळीवर पक्ष कोलमडताना दिसत असून अनेक ठिकाणी गटबाजी, निष्क्रीयता आणि दिशाहीन कार्यपद्धती यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
पक्षांतर्गत काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधात महिन्यांपासून तक्रारी असून, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद मिळण्याऐवजी कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांमुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची अवहेलना होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. कार्यकर्त्यांना जोडण्याऐवजी तोडण्याचेच काम पदाधिकारी करत असल्याचा आरोप होत आहे. काही भागांत तर राष्ट्रवादी (अजित गट) पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे.त्यामुळेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे फर्मान आल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मात्र, या दौऱ्यात नेहमीप्रमाणे भाषणं, सेल्फी आणि यशाचे गाणे गाण्याऐवजी, प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा आरसा पाहण्याची गरज आहे. तटकरे यांनी जिल्ह्याच्या गटशाखा, पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत परिस्थितीचा थेट आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट फक्त नावापुरतीच अस्तित्वात असून, इच्छाशक्ती, दिशा आणि नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो आहे. सुनील तटकरे यांचा दौरा हा केवळ औपचारिक ठरू न देता, तो वास्तवाचे भान देणारा आणि कठोर निर्णय घेणारा ठरावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
_
निवडणुकीत मतदारांसमोर कसं जाणार ?
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद होती. पक्षाची दोन शकले झाल्यानंतर दोन्ही गटांची ताकद कमकुवत झाली आहे. सत्तेत असूनही अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस निष्प्रभ आहे.
पदाधिकारी स्वमग्न आहेत. जिल्ह्यात पक्षाचा एकही मोठा मेळावा झालेला नाही. केवळ पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्याचे काम झाले पण गाव पातळीवर संघटन अस्तित्वात आहे का,याचे उत्तर खुद्द जिल्हाध्यक्षांना देता येणार नाही. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत.
सत्तेत असूनही काहीही कामे न केल्याने दोलायमान झालेल्या पक्षाचे नेते कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार आहेत, याचे उत्तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेण्याची आवश्यकता आहे.