आरंभ मराठी / धाराशिव
राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी निधीची तरतूद केली जाते. ही तरतूद करताना संबंधित जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी क्षेत्र तसेच इतर विकासात्मक निकषांचा विचार करून निधीचे नियोजन केले जाते.
जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात येणारा वार्षिक आराखडा हा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करून राज्य शासनाकडे सादर केला जातो. त्यानंतर नियोजन विभागाकडून निश्चित केलेल्या सूत्रानुसार प्रत्येक जिल्ह्याला निधीचे वाटप केले जाते.
राज्य शासनाने पुढील २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण २१ हजार ८६७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात एकूण ४०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मागील २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत तब्बल २७ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य तसेच विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








