आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील घाटंग्री शिवारात शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून बैलाला गंभीर जखमी केले आहे.
घाटग्री शिवारात तुकाराम लक्ष्मण जाधव यांची शेती असून त्यांची बैलजोडी त्यांनी शेतात बांधली होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने बैलावर हल्ला करून बैलाचा एक पाय तोडून खाल्ला.
बिबट्याने बैलाला गंभीर जखमी केले असून, शेतकऱ्याच्या बैलाचा एक पाय मांडीपासूनच तुटला आहे. गेल्या दोन दिवसापासून घाटंग्री शिवारात बिबट्या किंवा वाघ असण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती.
धाराशिव बार्शी रोड नजीक काही लोकांना हा बिबट्या दिसला होता. हा नेमका बिबट्या आहे किंवा आहे हे अजून समजले नसून, बैलावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या किंवा वाघच असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
घटनास्थळी गावकऱ्यांनी सध्या मोठी गर्दी केली असून, या हल्ल्याची माहिती वनविभागाला देखील कळवण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केलेले आहेत.
त्यातच बैलावर हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.