आरंभ मराठी / धाराशिव
यावर्षी मे महिन्यातच मुसळधार बरसलेला पाऊस जून आणि जुलै महिन्यात मात्र अनियमितपणे बरसला. त्यामुळे बळीराजाची घालमेल सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात तब्बल ४० दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर २२ जुलै पासून पुन्हा पावसाचे आगमन झाले.
मागील पाच दिवसात पडलेल्या संततधार पावसाने बळीराजाला दिलासा दिला. मात्र, आता पुन्हा एकदा पंधरा दिवसांसाठी पाऊस विश्रांती घेणार असल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन आठवडे पावसासाठी वातावरण प्रणाली अनुकूल नसल्यामुळे १० ऑगस्ट पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही.
स्थानिक वातावरण निर्मिती होऊन काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस हलक्या स्वरूपात असेल. व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पावसात खंड पडला तर फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनला त्याचा फटका बसू शकतो.
जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जून महिन्यात धाराशिव जिल्ह्यात सरासरी १२७ मिमी पाऊस पडतो. परंतु, जून महिन्यात केवळ ९८ मिमी पाऊस पडला. हा पाऊस सरासरीच्या केवळ ७८% म्हणजे अतिशय कमी होता.
जून महिन्यात केवळ तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तीन तालुक्यातच १००% पाऊस पडला. जुलै महिन्यात पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर या आठवड्यात सर्वदूर दमदार पाऊस पडला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ११९ मिमी पाऊस पडतो तर आतापर्यंत १४१ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या ११८% पडला.
त्यामुळे जुनपेक्षा जुलै महिना बळीराजासाठी समाधानकारक गेला. जून व जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात सरासरी २४६ मिमी पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ २३९ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या केवळ ९७% आहे. पावसाची दोन महिन्यातील ही आकडेवारी दुष्काळाची चाहूल देणारी आहे. मे महिन्यातील २९८ मिमी पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयात पुरेसा पाणीसाठा झाला आहे.
परंतु, ऐन पावसाळ्यात पडलेला पाऊस आतापर्यंत समाधानकारक पडलेला नाही. ऑगस्ट महिन्यात पहिले पंधरा दिवस पावसाचा खंड असला तरी पुढील पंधरा दिवसात मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
सोयाबीन सारख्या पिकांना आतापर्यंत संजीवनी मिळाली असली तरी ऊसासारख्या बागायती पिकांना दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. जून आणि जुलै महिन्यातील पावसामुळे जलाशयातील वाढ देखील किरकोळ झालेली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो. परंतु, यावर्षी १० ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. काही भागात हलक्या सरी पडू शकतात.
१० ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता कमी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. पुढे ते पश्चिम दिशेने प्रवास करत मध्य प्रदेशात गेले आहे. मध्य प्रदेशातील अंतर्गत भागात आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आणि ते उत्तर दिशेला सरकत गेले.
यापुढे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रात कोणत्याच हालचाली नाहीत. यामुळे पुढील आठ ते दहा दिवस म्हणजेच १० ऑगस्ट पर्यंत कुठलीच हवामान प्रणाली विकसित होणार नाही अशी शक्यता आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यात स्थानिक वातावरण निर्मिती होऊन काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे.
हा पाऊस मोजक्याच ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपात पडू शकतो. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा पूर्णपणे खंड स्वरूपात जाण्याची शक्यता आहे. १० ऑगस्ट रोजी अरबी समुद्रात केरळ च्या किनारपट्टीला कमी दाबाचे क्षेत्र विकसित होईल अशी शक्यता आहे.
जर हे क्षेत्र प्रभावी बनले तरच महाराष्ट्राच्या दक्षिण भागात १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे. फक्त पहिले दहा दिवस पाऊसाची शक्यता कमी आहे.
सुरज जयपाल जाधव
हवामान अभ्यासक.