Shared with Public
प्रतिनिधी / मुंबई
बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे २० मे रोजी नव्या दैनिकाचा आरंभ करत असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यानच्या कालावधीत नव्या दैनिकाच्या नावाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अर्थातच आपल्या सगळ्यांच्या पसंतीला उतरेल असं नाविन्यपूर्ण,सर्वंकष, सर्वसमावेशक, सकारात्मक, नवा विचार देणारं दैनिक देण्याची जबाबदारी वाढली आहे.या जबाबदारीची जाणीव ठेवूनच आरंभ मराठी हे वृत्तपत्र घेऊन लवकरच आपल्या भेटीला येत आहोत.
खरंतर गेली महिनाभर विचारांची कालवाकालव आणि मनाची घालमेल सुरू होती. हा नवा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही, ही जाणीव होत होती. पण महिनाभरात जिवाभावाच्या अनेकांनी प्रचंड ऊर्जा दिली.आम्ही सोबत आहोत, हे शब्द कितीतरी मोलाचे ठरत आहेत.
माध्यमांतील सहकाऱ्यांसह जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराने, ज्येष्ठ मान्यवरांनी या नव्या प्रवासासाठी पाठबळ दिलं.
पत्रकारितेच्या या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असताना जीवापाड प्रेम करणारी मंडळी मात्र पाठीशी प्रचंड ताकदीने उभी आहे, यातच ‘आरंभ मराठी’चं यश दडलं असावं, असा विश्वास वाटतो.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोगोचं विमोचन
आज दैनिक आरंभ मराठीच्या लोगोचं विमोचन राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले. यावेळी त्यांनी दैनिक आरंभ मराठीला शुभेच्छा दिल्या. यावेळी बंदरे व खनिज मंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री अर्जून खोतकर, आमदार ज्ञानराज चौगुले,शहाजी पाटील, डॉ.दिग्गज दापके-देशमुख, श्रद्धानंद माने-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आरंभ मराठीच्या कार्यालयाचे लवकरच उद्घाटन करत आहोत आणि त्यानंतर वेबसाईटचा शुभारंभ होईल. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दैनिकाचा ‘आरंभ’ करण्याचा प्रयत्न आहे.