प्रतिनिधी / धाराशिव
क्रीडाई उस्मानाबाद तर्फे बांधकाम व्यवसायिकाच्या व नगर परिषद नोंदणीकृत अभियंते यांच्या विविध मागण्यासाठी तसेच जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाशी निगडित शासकीय कार्यालयाकडून कामामध्ये होत असलेला विलंब आणि बांधकाम व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणीबाबत क्रीडाईच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,गौण खनिज वापर, गुंठेवारी, मोजणी विभागाकडून होत असलेला विलंब,एन.ए.संदर्भात नवीन आलेल्या शासकीय नियमाची अंमलबजावणी, तुकडे बंदी कायदा आणि बी.पी.एम.एस. प्रणाली संदर्भात येणाऱ्या अडचणी व ऑनलाईन बांधकाम परवान्यांना होत असलेला विलंब,यामुळे शहर, जिल्ह्याच्या विकास कामांवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे या समस्येवर, प्रलंबित कामांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायिकाच्या प्रश्नावर बांधकाम व्यवसायाशी निगडीत विविध कार्यालयात समन्वय साधून या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न याद्वारे क्रीडाई उस्मानाबादतर्फे करण्यात येत आहे. यावेळी क्रीडाई धाराशिवचे अध्यक्ष संजय देशमाने, प्रदीप मुंडे,रणजीत रणदिवे, आशिष पवार, पंकज बाराते, ऋषिकेश धाराशिवकर, प्रदीप खामकर, विश्वजीत देशमुख,शिवाजी पौळ,राजन पाटील आदी उपस्थित होते.