आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत मुसंडी मारत वर्चस्व सिद्ध केले आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपचे १२ नगरसेवक विजयी झाले असून, नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजय उर्फ पिटू गंगणे आघाडीवर आहेत. यापैकी एक सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने भाजपचा आकडा अधिक ठळक झाला आहे.
ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून तुळजापूर राज्यभर चर्चेत होता. याच पार्श्वभूमीवर ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी विजय गंगणे यांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरली. निवडणुकीचा ‘खरा चेहरा’ गंगणेच असल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष तुळजापूरकडे लागले होते.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार टीकेचे धनी ठरलेले गंगणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही जोरदार ताकद लावली होती; मात्र सध्याच्या निकालानुसार महाविकास आघाडीला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. मात्र, तुळजापूरच्या राजकारणात भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याने पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









