आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीवरून मोठी चर्चा रंगली असतानाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीचे जाहीर स्वागत करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून ‘घराणेशाही’चा आरोप करत या उमेदवारीवर टीका केली जात होती.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी समाज माध्यमावरून अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीचे उघडपणे समर्थन करत या चर्चांना निर्णायक वळण दिले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अर्चनाताई पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी दाखल केलेल्या दोन उमेदवारी अर्जांपैकी एकच अर्ज मागे घेत तेर गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात आणि विशेषतः सोशल मीडियावर त्यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती.
या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अर्चनाताई पाटील यांच्या कार्याची आणि अनुभवाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “सौ. अर्चनाताई पाटील या केवळ आमदारांच्या पत्नी म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहिलेल्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
त्यांनी अनेक वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रियपणे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी दोन वेळा जबाबदारी समर्थपणे पार पाडली असून जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, अर्चनाताई पाटील यांचा अनुभव, कार्यक्षमता आणि जनतेशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्षांनीच जाहीरपणे समर्थन केल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागले असून प्रचाराला वेग आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे अर्चनाताई पाटील यांच्याकडे भावी जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून पाहिले जात आहे. भाजपकडून त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली जाणार असल्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेच अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.








