आरंभ मराठी / धाराशिव
मंत्रालयीन स्तरावरील शिक्षण विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या श्रीकांत डोईफोडे याच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २०४ व २०५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद धाराशिवचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिनकर आंबादास होळकर (वय ४४) यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शिक्षणाधिकारी कार्यालयात असताना शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांचा त्यांना फोन आला.
मंत्रालयीन स्तरावरील शिक्षण विभागाचे अधिकारी अचानक भेट देण्यासाठी येणार असून, त्यांना वसतिगृह तपासणीसाठी प्रशासकीय सहकार्य करावे आणि त्यांच्या निवासाची शासकीय विश्रामगृहात व्यवस्था करावी, असा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा संदेश असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आला.
त्यानुसार होळकर यांनी श्रीकांत डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला. आपण पत्नी व मेव्हण्यासह तीन जण येणार असून, तुळजापूर येथे देवीदर्शन केल्यानंतर शासकीय वसतिगृह आणि अनुदानित शाळांची अचानक तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी विश्रामगृहात खोली आरक्षित करण्याची मागणीही केली.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांमार्फत विश्रामगृह आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांमार्फत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील शासकीय विश्रामगृहात खोली आरक्षित करण्यात आली. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांकही डोईफोडे यांना देण्यात आला. मात्र, डोईफोडे यांनी पाठविलेले ओळखपत्र हस्तलिखित स्वरूपातील होते. त्यावर महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई असा उल्लेख असला तरी पदनाम अपूर्ण असल्याने ते संशयास्पद वाटले. तसेच वसतिगृह आणि अनुदानित शाळेच्या तपासणीबाबत त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. धाराशिव व तुळजापूर येथे निवासाची व्यवस्था होत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी कळंब येथील विश्रामगृहात व्यवस्था करण्यास सांगितले.
या प्रकारामुळे संशय बळावल्याने होळकर यांनी पुणे येथील शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी श्रीकांत डोईफोडे नावाची तसेच त्यांनी सांगितलेल्या पदावर कार्यरत असलेली कोणतीही व्यक्ती पुणे शिक्षण विभागात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित व्यक्ती बनावट शासकीय अधिकारी असल्याचे भासवून शासकीय अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावर दबाव निर्माण करून शासकीय विश्रामगृहात खोली आरक्षित करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर उपशिक्षणाधिकारी दिनकर होळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली.
त्यानुसार श्रीकांत डोईफोडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २०४ व २०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आनंदनगर पोलीस करीत आहेत.











