आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ व पंचायत समितीच्या ३ अशा एकूण १२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीपेक्षा कमी उमेदवारांनी माघार घेतली. शनिवारी एकूण ७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३ उमेदवारांनी, तर पंचायत समितीसाठी ४ उमेदवारांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेअंतर्गत उपळा (मा.) गटातून सुनील मधुकर शेंडगे, सांजा गटातून राजदीप ज्ञानोबा गायकवाड आणि बेंबळी गटातून बिलाल मिनहाज कोतवाल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
पंचायत समितीमध्ये जागजी गणातून सुरज अनिल घोरपडे, येडशी गणातून शिल्पा महेश करपे व स्वाती सुनील शेळके, तसेच सांजा गणातून पुष्पा भागवत बळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटांसाठी एकूण २५० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आतापर्यंत १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता जिल्हा परिषदेसाठी २३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
तर धाराशिव तालुक्यातील पंचायत समितीच्या २४ गणांसाठी छाननीनंतर २६८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आतापर्यंत ७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता २६१ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या दोन दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एकूण १९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. उद्या दिनांक २५ जानेवारी रोजी रविवार असल्याने तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाहीत.
त्यामुळे दिनांक २७ जानेवारी हा एकमेव दिवस शिल्लक राहणार आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरी टाळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू होण्याची शक्यता असून, काही अपक्ष उमेदवारांनाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.








