आरंभ मराठी / धाराशिव
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ ‘ड’ मधून शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री व भूम–परांडा येथील आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या प्रभागात झालेल्या थेट लढतीत भाजपाचे उमेदवार अरुण राजवाडे यांनी गिरीराज सावंत यांचा ४,३७२ मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ ‘ड’ मध्ये बहुरंगी राजकीय लढत पाहायला मिळाली. भाजपाचे अरुण राजवाडे आणि शिवसेनेचे गिरीराज सावंत यांच्यात मुख्य सामना असला, तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, हिंदू महासभा तसेच तीन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर झाले.
निकालानुसार भाजपाचे अरुण राजवाडे यांना १५,०३३ मते मिळाली, तर शिवसेनेचे गिरीराज सावंत यांना १०,६६१ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय क्षीरसागर यांना ५,१९३ मते मिळाली, तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार पंढरीनाथ खोपडे यांना २,९२९ मते मिळाली. विशेष बाब म्हणजे ‘नोटा’ला देखील १,३४४ मते मिळाली असून, ती लक्षणीय मानली जात आहेत.
गिरीराज सावंत यांचा पराभव त्यांचे बंधू ऋषिराज सावंत यांच्यामुळेच झाल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण म्हणजे फेब्रुवारी २०२५ मध्ये ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. त्या बातमीमुळे सर्वांना धक्का बसला होता. माजी मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या त्या घटनेने तेंव्हा चांगलीच खळबळ उडाली होती.
मात्र अवघ्या काही तासात त्या बातमीतील सत्य समोर आले होते. ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नसून ते घरातून नाराज होऊन स्पेशल विमानाने थायलंड देशात जात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी सर्व सरकारी मदत घेऊन ऋषिराज सावंत यांना विमान परत फिरवण्यास भाग पाडले होते.
या सर्व घटनांमुळे तेव्हा बरीच चर्चा झाली होती. याच घटनेचा मुद्दा भाजपच्या उमेदवाराकडून प्रचारात आणला गेला. भाजपकडून केवळ त्या एका घटनेवरच संपूर्ण प्रचार केला जात होता. आणि भाजपच्या त्या प्रचाराला उत्तर देता देता गिरीराज सावंत यांना बॅकफूटवर जावे लागले. या एकाच मुद्द्यामुळे गिरीराज सावंत यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
गिरीराज सावंत यांच्या प्रचारासाठी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी मोठी ताकद लावली होती. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गिरीराज सावंत यांची नवी राजकीय इनिंग सुरू व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पसंती दिल्याने हे प्रयत्न अपुरे ठरले. विशेष म्हणजे, गिरीराज सावंत यांनी सुरुवातीला भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात अर्जही भरला होता.
मात्र भाजपाने पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गिरीराज सावंत यांनी अखेर आपल्या मूळ पक्षातून, म्हणजेच शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली. या पराभवामुळे माजी मंत्री व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पुण्यासारख्या महत्त्वाच्या महानगरात सावंत कुटुंबीयांची राजकीय पकड निर्माण करण्याचा प्रयत्न या निकालामुळे अपयशी ठरला.









