आरंभ मराठी / धाराशिव
शासकीय सेवेत असताना एकाच व्यक्तीने एकाच कालावधीत दोन वेगवेगळ्या पदांचे मानधन उचलून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आरोपी प्रवीण वसंत वराळे (रा. मुळेवाडी, ता. व जि. धाराशिव) यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, धाराशिव येथे प्रशासन व लेखा सहाय्यक (कंत्राटी) या पदावर कार्यरत असताना तसेच पोलीस पाटील या पदावर असताना, एकाच वेळी दोन्ही पदांचे मानधन उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीने ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 तसेच जानेवारी 2021 ते डिसेंबर 2023 या कालावधीत पोलीस पाटील पदावर कार्यरत असतानाच, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, धाराशिव येथे प्रशासन व लेखा सहाय्यक (कंत्राटी) या पदावर संपूर्ण वेळ नोकरी करून दोन्ही पदांचे मानधन घेतल्याचा आरोप आहे. यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वनिता राजेंद्र डोंगरे (वय 47 वर्षे, व्यवसाय नोकरी, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, धाराशिव) यांनी दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या प्रथम खबरेवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 236 व 237 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे शासकीय यंत्रणेतील नियंत्रण व तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पुढील चौकशीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.











