आरंभ मराठी / धाराशिव
राज्यात जाहीर झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या कार्यक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यातील काही नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, मुरुम, कळंब, भूम व परंडा या नगरपरिषदांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
द मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 च्या कलम 5 व कलम 5 (अ) मधील तरतुदीनुसार, मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या मान्यतेच्या आधारे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, नळदुर्ग, उमरगा, परंडा व मुरुम या नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार रविवार, दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या दिवशी होणारे बाजार पुढील योग्य दिवशी भरविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हा आदेश दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या सही व शिक्क्यानिशी जारी करण्यात आला असून, नागरिकांनी तसेच व्यापारी बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










