आरंभ मराठी / मुंबई
महाराष्ट्रात लहान मुलं पळवली जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून गेल्या तीन वर्षांत हे प्रमाण तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचा दावा करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिले आहे. हा प्रश्न केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून राज्याच्या सामाजिक सुरक्षिततेला लागलेला खोल घाव असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला देत राज ठाकरे यांनी २०२१ ते २०२४ या कालावधीत मुलं बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे नमूद केले आहे. लहान मुलांना पळवून नेऊन त्यांना कामाला जुंपणे, भीक मागायला लावणे अशा प्रकारच्या आंतरराज्य टोळ्या राज्यात सर्रासपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट करत सरकार नेमकी कोणती ठोस कारवाई करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ अमुक केसेस दाखल झाल्या आणि त्यातील इतकी टक्के मुलं सापडली अशी कोरडी उत्तरे महाराष्ट्राला नकोत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले आहे.
पोलिसांकडे प्रत्यक्षात किती पालक तक्रारी नोंदवतात, त्यापैकी किती तक्रारी यंत्रणांपर्यंत पोहोचतात, याबाबत शंका उपस्थित करत मुलं सापडली तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक आघाताचं काय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुळात अशा टोळ्या कार्यरतच कशा राहतात आणि इतक्या राजरोसपणे कशा काम करतात, याचा उलगडा सरकारला करता येत नाही का, असा थेट सवालही त्यांनी केला आहे.
आज रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर, बसस्थानकांवर भीक मागणारी लहान मुलं नेमकी कोणाची आहेत, त्यांच्या सोबतची माणसं खरंच आई-वडील आहेत का, याचा तपास करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे आहे का, असा प्रश्न उपस्थित करत गरज पडल्यास डीएनए चाचण्यांचे आदेश देण्याची हिंमत सरकार दाखवणार का, असा सवालही पत्रात करण्यात आला आहे.
लहान मुलं, तरुण मुली पळवल्या जात असताना यावर विधिमंडळात गांभीर्याने चर्चा होणार नसेल तर अधिवेशनाचं नेमकं प्रयोजन काय, असा सवाल उपस्थित करत हिवाळी अधिवेशन म्हणजे केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय बनली आहे का, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. अनेकदा सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती असते, अशा परिस्थितीत या विषयांवर चर्चा होईल अशी अपेक्षा करणेही अवाजवी वाटते, असे त्यांनी नमूद केले आहे.
हा प्रश्न केवळ राज्यापुरता मर्यादित नसून केंद्र सरकारने सर्व राज्यांशी चर्चा करून ठोस कृतिगट तयार करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करत वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत नसल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.









