आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव येथील महावितरण कार्यालयात बदली प्रकरणात तब्बल 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचे तीन कर्मचारी बुधवारी (दि.10) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले. या कारवाईमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणमधील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यासाठी तिघांनी एकत्रितरित्या 30 हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने हा प्रकार थेट एसीबी विभागाला सांगितला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्वनियोजित सापळा रचला आणि महावितरण कार्यालयात प्रत्यक्ष पैसे स्वीकारताना तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईत एचआर विभागातील डेप्युटी मॅनेजरसह इतर दोन कर्मचारी सहभागी आहेत. तिघेही लाच घेत असताना एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. घटनेनंतर काही काळ महावितरणच्या कार्यालयात खळबळ उडाली होती.
दरम्यान, आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महावितरणमध्ये चालत असलेल्या बदली प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहाराचा आणखी एक प्रकार पुढे आला असून यामुळे विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









