आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी आज (2 डिसेंबर) सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरूवात झाली. आठ तासांत म्हणजे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली असून, उरलेल्या एक तासात मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर उमेदवारांना भर द्यावा लागणार आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी एकूण 54.21 टक्के मतदानाची नोंद झाली असून, दुपारी तीननंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आठ तासांतील मतदानाचे प्रमाण असे आहे
धाराशिव नगरपालिका – 45.53%
तुळजापूर – 64.42%
नळदुर्ग – 55.71%
उमरगा – 54.21%
मुरूम – 60%
कळंब – 55.69%
भूम – 65.35%
परंडा – 59.11%
जिल्ह्यात सर्वाधिक मतदान भूम येथे 65.35 टक्के झाले आहे. त्याखालोखाल तुळजापूर येथे 64.42 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील एकूण 2 लाख 43 हजार मतदारांपैकी आतापर्यंत 1 लाख 31 हजार 243 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
यामध्ये –
पुरुष मतदार – 66988
महिला मतदार – 64242
नगरपालिकानिहाय मतदारांची संख्या
धाराशिव – 42802
तुळजापूर – 19044
नळदुर्ग – 9539
उमरगा – 17234
मुरूम – 8952
कळंब – 11671
भूम – 11813
परंडा – 10188
सकाळच्या पहिल्या दोन तासांत अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा दिसून आल्या. मात्र सकाळी अकरानंतर मतदानाचा वेग मंदावल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळेत मतदारांचे प्रमाण कमी असले तरी दुपारी तीननंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडले आहेत. नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत आणि सुरळीत मतदान सुरू आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी धाराशिव शहरासह तुळजापूर येथील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आहे. तुळजापूर येथे मतदान प्रक्रिया दरम्यान एका मतदान केंद्रावर एक वृद्ध महिला भोवळ येऊन पडली. काही वेळाने उपचार सुरू असताना त्या महिलेचे दुर्दैवी निधन झाले. जिल्ह्यातील इतर ठिकाणी मतदानाची टक्केवारी समाधानाकारक असताना धाराशिव शहरात मात्र मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही धाराशिव शहरात 50 टक्के देखील मतदान झालेले नाही. शेवटच्या एक तासात ही टक्केवारी फारशी वाढण्याची शक्यता दिसत नाही. दुसरीकडे तुळजापूर आणि भूम येथे 70% हून अधिक मतदान होण्याची शक्यता आहे.









