आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेचा निवडणूक प्रचार ऐन रंगात आला असतानाच काही जागांबाबत तांत्रिक वाद निर्माण झाल्याने या जागांवरती निवडणुका होणार की नाही अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर उमेदवार वैध किंवा अवैध आहे हे ठरवले जाते.
या संदर्भातील काही निर्णयाला कोर्टात आव्हान दिले जाते. धाराशिव नगरपालिका निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर प्रभाग क्रमांक 2 अ, 7 ब आणि 14 ब या तीन प्रभागातील उमेदवारांच्या विरोधात कोर्टात प्रकरण प्रलंबित होते. मागील तीन दिवस जिल्हा न्यायालयात दाखल अपीलामध्ये सुनावणी झालेली आहे.
आज सकाळी तीनही प्रकरणांचा निकाल जिल्हा कोर्टात जाहीर करण्यात आला. परंतु, विहित मुदतीत म्हणजेच 26 नोव्हेंबर पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या तीन जागांवर आता स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी दिली. ज्या प्रकरणात न्यायालयाचे आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत तसेच सुनावणी पुढील दिनांकास होणार आहे अशा जागांसाठी चिन्ह वाटप करण्यात यावे किंवा काय प्रक्रिया करावी यासाठी मार्गदर्शन मागविण्यात आले होते.
अशा प्रकरणात ज्या जागांसाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल असून सुनावणी प्रलंबित आहे किंवा सुनावणी झालेली आहे, परंतु आदेश अप्राप्त आहेत फक्त अशा जागांसाठी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करता येणार नाही असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तसेच फक्त अशा जागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
धाराशिव नगरपालिकेसोबतच राज्यातील इतर 25 नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ही स्थगिती देण्यात आली आहे. धाराशिव नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 2 अ, 7 ब आणि 14 ब मधील निवडणुक पुढील आदेशापर्यंत स्थगित झाली आहे. या प्रभागातील उमेदवारी अर्जाबाबत कोर्टात गेलेल्या प्रकरणांचा गुरुवारी सकाळी निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विहित दिनांकाच्या पूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबर पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे ही स्थगिती आली आहे.
पुढे काय –
तीन जागांवर निवडणूक घेण्यास स्थगिती आली असली तरी आज रात्रीपर्यंत निवडणूक आयोग यावर आणखी विचारविनिमय करून काही निर्देश देणार आहे. स्थगिती कायम ठेवल्यास 2 डिसेंबर रोजी इतर जागांवर मतदान होईल. परंतु अगोदर जाहीर केल्याप्रमाणे 3 डिसेंबरला मतमोजणी होऊ शकणार नाही. राहिलेल्या तीन प्रभागातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून आणखी मार्गदर्शन मागवण्यात आलेले आहे.












