आरंभ मराठी / धाराशिव
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सगळीकडे उमेदवारांची धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. नगर परिषद कार्यालयात नामनिर्देशन अर्जांच्या छाननीदरम्यान परांडा येथे गोंधळ उडाला होता. तसेच दगडफेक देखील झाली होती. त्यामुळे आता आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत सरकारी कामात विघ्न निर्माण केल्याप्रकरणी तब्बल २६ जणांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर सौदागर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथम खबरेनुसार, 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 3 वाजता परंडा नगरपरिषद कार्यालयातील सभागृह व मुख्य प्रवेशद्वाराजवळ नामनिर्देशन छाननी सुरू असताना आरोपींनी एकत्र येऊन गोंधळ निर्माण केला. या गोंधळात नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य गेटवर दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकीत शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्यासोबतच स्वयं आरोपींचे तसेच इतरांच्या जिवीतासही धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनास्थळी कायदा-सुव्यवस्थेचे पालन न करता जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामधे जाकीर इस्माईल सौदागर, कैफ अब्दुल सौदागर, मोसीन जाकीर सौदागर, उबेद वाहेद आत्तार, रहिमान सौदागर, औरब वाहेद सौदागर, फाजील इस्माईल सौदागर, गबु इस्माईल सौदागर, वाहेद इस्माईल सौदागर, सोनू आत्तार रहिमान सौदागर, शरफराज महंमद शरिफ कुरेशी, शेरू इस्माईल सौदागर, नसीम अहमद पठाण, शफी अहमद पठाण, इरफान जब्बार शेख, मुनाफ सौदागर, ईफू निसार सौदागर, नुतलिब अब्दुल सत्तार कुरेशी, इस्माईल सत्तार कुरेशी, मोसीन दस्तगीर कुरेशी, सम्मद अब्दुल सत्तार कुरेशी, रफीक कुरेशी, ईरशाद आलीशान कुरेशी, बिलाल खुद्रुस कुरेशी, अलिशान कुरेशी (सर्व रा. परंडा, ता. परंडा, जि. धाराशिव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नगरपरिषद कार्यालयातील नगर अभियंता राहुल बंडू रणदिवे (रा. बावची रोड, परंडा) यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 223, 221, 189(2), 191(2), 190, 125, 194(2) सह कलम 135 मोवाका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून निवडणूक काळातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.









