आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरात मागील दोन दिवसांपासून स्थगिती देण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामावरून महाविकास आघाडी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या वादाला सोशल मीडियासह शहरातील प्रमुख चौकांवर लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे अधिक रंग चढला आहे.
कालपासून सोशल मीडियावर परस्परांवर टीका करणारे पोस्टर आणि व्हिडिओ शेअर होत होते, तर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात दोन्ही गटांनी भलेमोठे होर्डिंग्ज लावून एकमेकांवर थेट टीका केल्याचे दिसले. या अनधिकृत होर्डिंग्जमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात राजकीय वातावरण तापले होते.
प्रशासनाच्या दृष्टीने हा संवेदनशील परिसर असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत होती. अखेर दुपारी चार वाजता धाराशिव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज हटविले. सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय होर्डिंग्ज लावल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, स्थगित रस्त्यांच्या कामांबाबत सुरू असलेला राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरून प्रत्यक्ष शहराच्या रस्त्यांवर येऊन ठेपला असल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळाले.
रास्ता रोको, उपोषण आणि घोषणाबाजी यांमुळे या प्रश्नावरून तणाव वाढत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाने कारवाई केल्यामुळे सध्या हा परिसर मोकळा झाला आहे.









