महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये रस्त्याच्या कामावरून तणाव निर्माण झालेला असतानाच शहरात रस्त्याचे काम सुरू
आरंभ मराठी / धाराशिव
शहरात जिल्हा नियोजन समिती आणि नगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामावरून सुरू असलेल्या वादविवादाच्या, श्रेयवादाच्या आणि महायुती–महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अखेर बार्शी–उजनी मार्गावरील कामाला सुरुवात झाली आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात बांधकाम विभागाने ‘काम बोलतेय’ असा संदेश देत जिजाऊ चौक ते भवानी चौक या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम हाती घेतले आहे.
अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी व्यापलेल्या या रस्त्याची अवस्था नागरिकांसाठी त्रासदायक ठरली होती. याच रस्त्यावर गेल्या वर्षी एका व्यापारी तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. ‘दैनिक आरंभ मराठी’ने या रस्त्यासंदर्भात सातत्याने आवाज उठवला होता. अखेर आज काम सुरू झाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, उशिरा का होईना, पण खड्ड्यातून सुटका होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.मात्र हे काम जिल्हा नियोजन समिती किंवा नगरपालिकेच्या निधीतून नव्हे तर राज्य मार्गासाठी अनेक वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या सरकारच्या निधीतून होत आहे.
अतिक्रमण कायम, बांधकाम विभागाच्या कारवाईकडे लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अधिकारी प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली भवानी चौक ते राजमाता जिजाऊ चौक या मार्गावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. नोटीस मिळाल्यानंतर तब्बल साठ टक्के अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. मात्र या मार्गावर अजूनही काही अतिक्रमण आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १२ मीटर रुंदीचा मार्ग मोकळा करून सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यास या मोहिमेमुळे मदत होईल, असा बांधकाम विभागाचा दावा आहे.
मात्र, संत गाडगेबाबा चौक ते जिजाऊ चौकदरम्यान मोठ्या इमारतींचे अतिक्रमण असल्याचे विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. या अतिक्रमणांवर कारवाई कशी होईल, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.












